सीमाभागातील 856 गावांमध्ये लाडकी बहीण योजना राबवावी
डॉ. किरण ठाकुर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी/ पुणे
महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना यशस्वी लागू केली. याच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील महिला भगिनींसाठी अशीच महत्त्वाकांक्षी योजना लागू करावी, त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी केली.
डॉ. किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी 15 ऑगस्ट रोजी भेट घेतली. या भेटीदरम्यान सादर केलेल्या निवेदनात डॉ. किरण ठाकुर यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. अशाप्रकारची मदत सीमा भागातील 856 हून अधिक गावांमधील मराठी भाषिक महिलांनादेखील मिळणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच काही महिला विवाहापूर्वी सीमाभागातील मराठी भागात म्हणजे बेळगाव, निपाणी येथे होत्या, विवाहानंतर त्या महाराष्ट्रात स्थायिक झाल्या. या संदर्भाने योजनेतील अटी-नियमांमध्ये शिथिलता असावी. राज्य शासनाने केलेली ही मदत सीमावर्ती भागातील महिलांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मोलाची मदत ठरेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.