चिपी विमानतळ सुरू राहण्यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
राजकीय श्रेयवादावरून बहुचर्चित ठरलेले आणि अतिशय गाजावाजा करून उद्घाटन झालेले सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ तीन वर्षांतच बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सक्षम नसलेली सिग्नल यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही दोन प्रमुख कारणे विमानतळ बंद राहण्यास कारणीभूत ठरत आहेत. मागील तीन महिन्यांत एकही प्रवासी विमान या विमानतळावर उतरलेले नाही. त्यामुळे चिपी विमानतळावरून राजकीय श्रेयवाद घालणारे लोकप्रतिनिधी आणि केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांकडून चिपी विमानतळ सुरू राहण्यासाठी का प्रयत्न केला जात नाही? की राजकीय इच्छाशक्तीच राहिलेली नाही, असा सवाल प्रवासी वर्गातून विचारला जात आहे. त्याचबरोबर बंद पडणाऱ्या विमानतळाची जबाबदारी कुणी घेणार की नाही, असाही सवाल केला जात आहे.
पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणच्या विकासात महत्त्वाची भूमिका असणारा सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ प्रकल्प मंजूर होऊन तो पूर्णत्वास जाण्यास वीस वर्षे लागली. 9 ऑक्टोबर 2021 रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्यावेळी खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते. केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हेही दिल्लीहून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. या उद्घाटनादरम्यान प्रत्येकाने राजकीय श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कोकणात औद्योगिक गुंतवणूक व पर्यटन वाढीसाठी कोकणच्या विकासाला नवा अध्याय ठरेल, असे सांगितले. परंतु विमानतळ उद्घाटनानंतर मागे वळून पाहिल्यास गेल्या तीन वर्षांत विमानतळ सुरू राहण्यासाठी कोणीही ठोस प्रयत्न केलेले दिसत नाहीत. म्हणूनच आता चिपी विमानतळ बंद पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
विमानतळ सुरू करण्याचे श्रेय कुणीही घ्यावे, पण ते कायमस्वरुपी सुरू राहण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. आता तर विरोधकच राहिले नाहीत, अशी स्थिती आहे. राज्यात व केंद्रात भाजप महायुतीची सत्ता आहे. मग विमानतळ सुरू राहण्याकडे किंवा किमान चिपी-मुंबई फेरी सुरू राहण्यासाठीही दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न पडत आहे.
अलायन्स एअरलाईन्सची चिपी-मुंबई विमानसेवा बंद होऊन तीन महिने झाले. पाठोपाठ ‘फ्लाय 91’ च्या हैदराबाद व बेंगळूर सेवाही बंद झाल्या. अलीकडेच सुरू झालेली पुणे ते चिपी ही आठवड्यातून दोन दिवस सुरू असलेली विमानसेवाही आता अनियमित व वारंवार लगतच्या मोपा विमानतळावर वळविण्यात येत आहे. अशीच स्थिती राहिली, तर नजीकच्या काळात चिपी विमानतळ कायमस्वरुपी बंद पडू शकते.
विमान सेवा बंद पडू लागल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. उबाठा शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रवासी विमान सेवा सुरू न झाल्यास टाळे ठोकणार, असा इशारा दिला होता. तर टाळे कसे ठोकणार, ते मी बघतो, असा प्रतिइशारा खासदार नारायण राणे यांनी दिला होता. त्यामुळे केवळ आरोप आणि प्रत्यारोप करण्यातच लोकप्रतिनिधींनी धन्यता मानल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच तीन महिन्यांनंतरही विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही. विमानसेवा तांत्रिक कारणामुळे बंद पडली असून लवकरच नियमित सेवा सुरू होईल, अशी आश्वासने सत्तारुढ नेत्यांकडून दिली जात होती. प्रत्यक्षात मात्र उलट स्थिती आहे. 300 कोटी ऊपये खर्च करून उभारलेल्या या विमानतळावर थोड्याशा खराब हवामानातही विमान उ•ाण करण्यासाठी सक्षम सिग्नल यंत्रणा नाही, हे विमानसेवा प्रारंभ झाल्यापासून उघड झाले होते. कॅट 1 ते 2 आय. एल. एस. प्रिसिजन अॅप्रोच लँडिंग सिस्टीम यासारख्या आधुनिक सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतरच खराब हवामानात व रात्री उ•ाणे शक्य होतात. परंतु चिपी विमानतळावर अशी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे प्रवासी असूनही अनियमित सेवेला तोंड द्यावे लागत आहे.
रस्ते व टोल वसुली करणाऱ्या आयआरबी कंपनीकडे विमानतळ चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. राज्याच्या इतर भागातील विमानतळ महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास महामंडळ म्हणजेच एमएडीसीमार्फत बांधण्यात आले असताना चिपी विमानतळ मात्र एमआयडीसीमार्फत बांधण्यात आले आहे. विमानतळाला आवश्यक असणारी वीज, पाणीपुरवठा व रस्ते ही कामे राज्य शासनाने करायची असून ती आजही अपूर्ण आहेत. तरीही प्रवाशांचा बऱ्यापैकी प्रतिसाद विमान सेवांना लाभत होता. परंतु, अपूर्ण सुविधा, प्रवाशांच्या गरजेच्या वेळेत नसणारी विमानसेवा, अचानक रद्द होणारी विमाने, अनियमित विमानसेवा तसेच सण, सुट्ट्यांच्या कालावधीत गगनाला भिडणारे तिकीट दर या कारणांमुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी होत गेला. दीड वर्षापूर्वी जिल्ह्याच्या सीमेवर सुरू झालेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर चिपी विमानतळावरील सेवा एकापाठोपाठ एक बंद पडत गेल्या.
विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्रीस्तरावर बोलणी सुरू आहेत व लवकरच विमानसेवा सुरू होईल, असे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले होते. मात्र अद्याप काहीच प्रगती झालेली नाही. मालवण येथील नौदल दिनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चिपी विमानतळवर आले तेव्हा नाईट लँडिंग यंत्रणा सुरू होती. मग, त्यानंतर ती बंद का, असा सवाल केला जात आहे.
केंद्रीय यंत्रणेकडून केलेल्या सर्व्हेनुसार चिपी येथून फक्त मुंबई मार्गावर विमानसेवेला अनुकूल परिस्थिती आहे. परंतु मुंबईसारख्या व्यस्त विमानतळावर सध्या स्लॉट उपलब्ध नाहीत. येत्या मे महिन्यापासून नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत सुरू होत आहे. लगोलग मुंबई विमानतळावरील एक टर्मिनल तीन वर्षे प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून त्याठिकाणी नवीन टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई विमानतळावरील बहुतांश देशांतर्गत सेवा नवी मुंबई विमानतळावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे चिपीकरिता नजीकच्या काळात मुंबईकरिता विमान सेवा सुरू होणार का, हा प्रश्न आहे.
केंद्र व राज्यातील सत्तारुढ पक्षांच्या नेत्यांनी यात गांभीर्यपूर्वक लक्ष घालणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत तीन महिने चिपीतील प्रवासी विमानसेवा बंद असूनही ती सुरू करण्याच्या दृष्टीने राजकीय इच्छाशक्ती दाखवली जात नसल्याची खंत प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांनी राज्य, केंद्र स्तरावर खास बैठक आयोजित करून जे काही प्रश्न असतील किंवा तांत्रिक अडचणी असतील, त्या दूर करून चिपी विमानतळावर प्रवासी विमानसेवा सुरू राहण्याकरीता प्रयत्न करायला हवेत. तरच हे विमानतळ सुरू राहील अन्यथा ते कायमस्वरुपी बंद पडू शकते.
संदीप गावडे