पावसाअभावी वनक्षेत्रात चारा-पाण्याचा तुटवडा
खाद्याच्या शोधात वन्यप्राणी सैरभैर, वन्यप्राणी शिवारात येत असल्याने उपाययोजनांची गरज
बेळगाव : यंदा सरासरी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने वनक्षेत्रात वन्यप्राण्यांना चारा-पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. परिणामी वन्यप्राणी चारा आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत आणि शिवारात येऊ लागले आहेत. अलीकडे या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. खानापूर विभागातील वन क्षेत्रात चारा आणि पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे वन्यप्राणी सैरभैर होऊ लागले आहेत. खानापूर विभागातील लोंढा, नागरगाळी, गोल्याळी, कणकुंबी, जांबोटी, भीमगड आदी जंगल परिसरात वन्यप्राण्यांचा आधिवास आहे. विशेषत: वाघ, बिबटे, हत्ती, अस्वल, डुक्कर, गवी रेडे, साळींद्र, तरस, रानमांजर, कोल्हे, हरीण, चित्तळ, सांबर, ससा आदींची संख्या टिकून आहे. मात्र, वनक्षेत्रात पावसाअभावी चारा-पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांसमोर उपजिविकेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. विशेषत: नागरगाळी, गोल्याळी, जांबोटी, कणकुंबी आदी वनक्षेत्रात चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. परिणामी येत्या उन्हाळ्यात वन्यप्राण्यांचे चारा-पाण्याविना हाल होणार आहेत.
अलीकडे खानापूर विभागातील वनक्षेत्रात घनदाट वनराई, बांबूचे आच्छादन, हिरवेगार गवत आणि बारामाही वाहणारे पाणी आदी कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ससा, रानमांजर, कोल्हे, हरीण, चितळ, सांबर आदींची संख्या वाढली आहे. यावर उपजिविका करणाऱ्या वाघ, बिबट्या, तरस यांची संख्या टिकून आहे. मात्र, काही वनक्षेत्र विभागात पावसाअभावी चाऱ्याची वाढ झाली नाही. वनक्षेत्रात पाणीदेखील नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांसमोर चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान भक्ष्य आणि चारा-पाण्याच्या शोधात वन्यप्राणी भटकंती करू लागले आहेत. यंदा नोव्हेंबर महिन्यातच वनक्षेत्रात चारा-पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भविष्यात परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात वनक्षेत्रात चारा व पाण्याची काही प्रमाणात कमतरता जाणवते. मात्र, यंदा हिवाळ्यातच चारा-पाण्यासाठी प्राण्यांना संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान, चारा-पाण्याच्या शोधातच वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. विशेषत: डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारातील पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. ऊस, भात, भुईमूग, रताळी, सोयाबीन पिकांची नासधूस होऊ लागली आहे.
पाळीव प्राण्यांवरही हल्ले
वन्य प्राण्यांकडून भक्ष्य म्हणून पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे मागील सहा महिन्यात शेकडो पाळीव प्राणी शिकार बनले आहेत. वनक्षेत्रात पुरेसा चारा-पाणी मिळत नसल्याने वन्यप्राणी मानवासह पाळीव प्राण्यांवर झडप घालू लागले आहेत. विशेषत: खानापूर विभागातील वनक्षेत्राला लागून असलेल्या गावांमध्ये हे प्रकार वाढू लागले आहेत. विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड होऊ लागली आहे. त्यामुळे वनक्षेत्राच्या प्रमाणात घट होऊन नैसर्गिक आधिवास कमी होऊ लागला आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांना खाद्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वनक्षेत्राशेजारील शिवारातील पाळीव जनावरे भक्ष्यस्थानी पडू लागली आहेत.
अलीकडे डोंगर क्षेत्रात वाढ
खानापूर विभागामध्ये मलप्रभा, म्हादईमुळे वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न नाही. शिवाय डोंगर परिसरात काही ठिकाणी तलाव खोदण्यात आले आहेत. त्याठिकाणी पाणी उपलब्ध आहे. अलीकडे डोंगर क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे मुबलक चारा साठा उपलब्ध आहे.
- संतोष चव्हाण, (एसीएफ, खानापूर)