सुविधांचा अभाव; तरीही बेळगावला भाव!
बेंगळूरनंतर बेळगावातील मायक्रो इंडस्ट्रीजची भरभराट : शहरामध्ये 25 हजार 538 मायक्रो इंडस्ट्रीज
बेळगाव : कोणत्याही पायाभूत सुविधा नसतानाही उद्योग क्षेत्रात बेळगावची भरभराट होत आहे. सरकारने उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने खासगी जागांमध्ये उद्योग सुरू करून अनेकांना बेळगावच्या उद्योजकांनी रोजगार दिला आहे. बेंगळूरनंतर सर्वाधिक मायक्रो इंडस्ट्रीज बेळगावमध्ये असल्याचे एका आकडेवारीतून जाहीर झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी औद्योगिक क्षेत्रासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. कर्नाटक राज्यात सर्वाधिक मायक्रो इंडस्ट्रीज या बेंगळूर शहर व जिल्ह्यामध्ये आहेत. एकूण 64 हजार 423 मायक्रो इंडस्ट्रीज बेंगळूरमध्ये आहेत. त्यापाठोपाठ बेळगाव शहरामध्ये 25 हजार 538 मायक्रो इंडस्ट्रीज आहेत. तर बागलकोट जिल्ह्यात 8 हजार 797 मायक्रो इंडस्ट्रीज असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मायक्रो इंडस्ट्रीजमध्ये बेळगाव जिल्हा दुसऱ्यास्थानी असतानाही औद्योगिक वसाहतींना रस्त्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही सुविधा नाहीत.
बेळगाव शहर व परिसरात उद्यमबाग, अनगोळ, मजगाव, मच्छे, वाघवडे रोड, नावगे रोड, काकती, होनगा व ऑटोनगर येथे औद्योगिक वसाहती आहेत. याबरोबरच हत्तरगी, कणगला, कित्तूर या ठिकाणीही काही प्रमाणात उद्योग सुरू आहेत. कणगला येथे नव्याने वसलेल्या औद्योगिक वसाहतीत अनेक मोठे कारखाने उभे राहिले आहेत. परंतु, बेळगाव शहर परिसरात अनेक मायक्रो इंडस्ट्रीज सरकारच्या कोणत्याही सुविधांविना सुरू आहेत. मायक्रो इंडस्ट्रीमध्ये फूड प्रोसेसिंग, स्पेअरपार्ट्स, लेथ मशीन मॅन्युफॅक्चरिंग यासह अनेक मायक्रो इंडस्ट्री आहेत. इतर जिल्ह्यांना राज्य सरकारकडून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी बेळगावमध्ये तशा सुविधा नाहीत. रस्ते, पाणी, चांगल्या दर्जाची वीज, वाहतूक व्यवस्था यासह इतर सुविधांसाठी उद्योजकांना रोज कसरत करावी लागते. वाढते उद्योग पाहता बेळगावमध्येही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे.
राज्यातील मायक्रो इंडस्ट्रीजची संख्या
जिल्हा उद्योगांची संख्या
बेंगळूर.............64 हजार 423
बेळगाव.......... 25 हजार 538
बागलकोट......... 8 हजार 797
धारवाड............ 8 हजार 224
विजापूर............ 2 हजार 748