For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंद्रमौळी कॉलनीत सुविधांची वानवा

11:09 AM Apr 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
चंद्रमौळी कॉलनीत सुविधांची वानवा
Advertisement

नियमित कर भरूनही महापालिकेचे दुर्लक्ष : विविध समस्यांनी स्थानिक नागरिक हैराण

Advertisement

बेळगाव : स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या बेळगाव शहरातील अनेक उपनगरे पायाभूत सुविधांपासून आजही वंचित आहेत. यापैकी चंद्रमौळी कॉलनीतही पायाभूत सुविधांची वानवा असून रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याच्या समस्येने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. महांतेशनगर पुलावरून कणबर्गीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या जवळच ही कॉलनी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही वसाहत महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आहे. या कॉलनीत 700 हून अधिक नागरिक वास्तव्य करतात. मनपाला नियमितपणे करही भरला जातो. तरीही प्रशासनाला या कॉलनीचा विसर पडला आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या परिसरातील रस्त्यांची वाताहात झाली आहे. गटारीची व्यवस्थाही नाही. त्यामुळे रोगराईला आमंत्रण देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गटारीचे पाणी सखल भागातील घरांजवळ साचून आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते. गटारीचे पाणी पूर्णपणे रस्त्यावर येते. त्यामुळे मनपाने या कॉलनीला सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी बसवाणी नायक यांनी केली. कॉलनीत एक उद्यान आहे. या उद्यानात फुलझाडांऐवजी रान वाढले आहे. परिसरातील अनेक नागरिक वॉकिंगसाठी याच उद्यानात येतात. गवतामुळे सरपटणाऱ्या विषारी जीवांचा वावर अधिक आहे. त्यामुळे लहान मुलांना या उद्यानात खेळण्यासाठी पाठवताना पालक घाबरतात. उद्यानातील कूपनलिकाही नादुरुस्त झाली आहे. ती त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी निंगनगौडा पाटील या रहिवाशाने केली आहे.

Advertisement

पाण्याची टाकी उभारून पाणीपुरवठा करण्याची मागणी

चंद्रमौळी कॉलनीतील गैरसोयींविषयी अनेक वेळा मनपा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. कोणीच याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सध्या पाच ते सहा दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती आहे. भर उन्हात अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची टाकी उभारून पाणीपुरवठा करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.