For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाड्यांमध्ये शुद्ध पाण्याची कमतरता

10:28 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंगणवाड्यांमध्ये शुद्ध पाण्याची कमतरता
Advertisement

बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर : प्रशासन मात्र सुस्त

Advertisement

बेळगाव : बालमनावर संस्कार करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमध्ये पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. मध्यंतरी जलमिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही बहुतांशी अंगणवाड्या शुद्ध पाण्यापासून वंचित असल्याचे दिसत आहे. काही अंगणवाडी केंद्रांमध्ये अशुद्ध पाण्याचाच वापर होत असल्याचेही समोर आले आहे. जिल्ह्यात 5,531 अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यामध्ये अलीकडे नवीन अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे. बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी शासनाकडून चिक्की, अंडी आणि आहार दिला जातो. मात्र, पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. नाईलाजास्तव अंगणवाडी केंद्रांना मिळेल त्या ठिकाणचे पाणी घ्यावे लागत आहे. यंदा सर्वत्र पाणीसमस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यातच अंगणवाडी केंद्रांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्व अंगणवाडी केंद्रांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, या सूचनेचे गांभीर्य नसल्याचेही दिसत आहे. शुद्ध पाण्यासह अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वतंत्र नळजोडणी नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. त्याबरोबरच काही अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहांची देखील कमतरता आहे. त्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रातून शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही होत आहे.

जलमिशन योजनेंतर्गत पाठपुरावा

Advertisement

सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलमिशन योजनेंतर्गत पाठपुरावा करण्यात आला आहे. काही अंगणवाडी केंद्रांमध्ये ही योजना राबवून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. इतर सर्वच अंगणवाडी केंद्रांमध्ये पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- नागराज आर. (महिला व बालकल्याण खाते, सहसंचालक)

Advertisement
Tags :

.