पाकिस्तानात कामगार संकट
आखाती देशांमध्ये कामगार निर्यात ठप्प : पाकिस्तानींचा रोजगार हिरावला
इराण युद्धामुळे पाकिस्तानात अभूतपूर्व ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ केली आहे. याचदरम्यान देशात निर्माण झालेल्या कामगार संकटाने शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवसथा बऱ्याचअंशी आखाती देशांना होणाऱ्या कामगार निर्यातीवर निर्भर आहे. या देशांमध्ये लाखो पाकिस्तानी नागरिक काम करतात. परंतु इराण युद्धामुळे या कामगारांच्या मागणीत मोठी घट दिसून आल्याने पाकिस्तान त्रस्त आहे. पाकिस्तानला या कामगारांच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विदेशी चलन प्राप्त होते. परंतु आता यात घट होण्याची भीती आहे.
पाकिस्तानला मोठा झटका
अलिकडच्या वर्षांमध्ये पाकिस्तानने कामगार निर्यात आणि त्यांच्याकडून पाठविण्यात येणाऱ्या रेमिटेंसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. पाकिस्तानींची सर्वात मोठी संख्या सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि कतारमध्ये आहे. पूर्वी दरवर्षी 30 ते 40 हजार कामगार दरवर्षी पाकिस्तानातून आखातात काम करण्यासाठी जात होते. पाकिस्तानला लवकरच ही संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा होती, परंतु इराण युद्धामुळे स्थिती बदलली असल्याचे पाकिस्तानच्या आर्थिक सल्लागार समुहाचे माजी अध्यक्ष सैयद जावेद हसन यांनी नमूद केले आहे.
रोजगारप्राप्तीचे आव्हान
इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेच्या देशांमध्ये आर्थिक मंदी येत आहे. यात पाकिस्तानींना नोकरी पुरविणारे तीन आघाडीचे देश सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि कतार सामील आहे. यामुळे दरवर्षी 80 हजार पाकिस्तानी कामगारांना पाठविण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. बेरोजगारीमुळे लोकांची क्रयशक्ती घटतेय, तर सामग्रीचेदर वेगाने वाढत आहेत. देशातही या कामगारांसाठी कुठलाच रोजगार नाही तसेच असलेल्या नोकऱ्यांमध्ये आखाती देशांइतके वेतन मिळत नसल्याचे चित्र आहे.
पाकिस्तानचे आर्थिक संकट
-पाकिस्तान स्वत:च्या इतिहासातील सर्वात गंभीर आर्थिक संकटाला सामोरा जातोय. पाकिस्तानात महागाई दर उच्चांकी स्तरावर असून देशातील गरीबीचे प्रमाण 43.5 टक्क्यांपर्यत पोहोचले आहे.
-मध्यपूर्वेतील संघर्षाने पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी अधिक बिघडविली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने पाकिस्तानात महागाईचे संकट विक्राळ होत चालले आहे.
-पाकिस्तानवर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मोठे कर्ज आहे, यामुळे पाकिस्तानवर या दोन्ही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कठोर अटी लागू असून त्यांचे पालन करणे त्याच्यावर बंधनकारक आहे.
आखातातून कामगार परतल्यास....
आखातात किती कामगारांची निर्यात केली जाऊ शकते ही पाकिस्तानसाठी सर्वात मोठी भीती नाही, खरी भीती ही आखाती देशांमधून कामगार परतण्याच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो का ही आहे. अशास्थितीत आणखी अनेक समस्या उभ्या ठाकतील, कारण पाकिस्तानसाठी परतणाऱ्या या कामगारांपैकी अनेकांना पुन्हा समाज आणि अर्थव्यवस्थेत सामावून घेणे अत्यंत अवघड ठरणार असल्याचे मत हसन यांनी व्यक्त केले आहे.