एल2 : एम्पुरान’चा मुद्दा संसदेत उपस्थित
माकप खासदाराचा सरकारवर आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात मल्याळी चित्रपट ‘एल2 : एम्पुरान’वरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रेक्षकांचा एक वर्ग या चित्रपटातील काही दृश्यांवर पक्षपाताचा आरोप करत आहे. अनेक राजकीय पक्ष देखील या चित्रपटाला आक्षेपार्ह ठरवत आहेत. याचदरम्यान माकप खासदाराने राज्यसभेत या चित्रपटाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
माकप खासदार जॉन ब्रिटास यांनी बुधवारी अभिनेता मोहनलाल यांचा चित्रपट ‘एल2 : एम्पुरान’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यावर मिळत असलेल्या कथित धमक्या आणि यामुळे झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांचा मुद्दा उपस्थित केला. हा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या देशात दुर्दैवी घटना घडत आहेत. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होतोय. ज्या चित्रपटाला सेंसर करण्यात आले होते, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आले, त्याला पुन्हा सेंसर बोर्डासमोर पुन्हा नेण्यास सांगण्यात आले आणि धमक्यांमुळे या चित्रपटातील 24 दृश्यं वगळण्यात आल्याचा दावा ब्रिटास यांनी केला आहे.
चित्रटपाच्या नायकाला राष्ट्रविरोधी ठरविण्यात आले. या देशात अशी स्थिती असेल तर लोकांना देण्यात येणारे अभिव्यक्ती आणि बोलण्याचे स्वातंत्र्य धोक्यात येईल अशी भीती मला वाटतेय. अभिव्यक्ती आणि बोलण्याचे स्वातंत्र्य पवित्र असल्याचे उद्गार ब्रिटास यांनी काढले आहेत.
ख्रिश्चन धर्माच्या विरोधात चित्रपट!
हा चित्रपट ख्रिश्चन धर्माच्या विरोधात आहेत. कम्युनिट भारतातील प्रत्येक धर्माचा अपमान करू पाहत असल्याचा आरोप अल्पसंख्याक विषयक राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी केला आहे. तर चित्रपटातील मुख्य अभिनेते मोहनलाल यांनी वादग्रस्त दृश्यांबद्दल जाहीर माफी मागत वादग्रस्त दृश्यं वगळण्याची तयारी दर्शविली होती.