रशियाच्या भीषण हल्ल्यांमुळे हादरले कीव : 17 जण ठार
कीव : मागील 4 वर्षांपेक्षा अधिक काळापासून रशिया आणि युक्रेनदरम्यान जारी युद्ध आता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनची राजधानी कीववर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे कीव शहर पूर्णपणे हादरले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 39 जण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरापासून कीवमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजू लागले होते. याच्या काही वेळातच रशियाकडून घातक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्सचा वर्षाव सुरू झाला. कीवच्या डेस्न्यान्स्की भागात एका 9 मजली इमारतीवर अनेक क्षेपणास्त्रs आदळल्याने त्याचा हिस्सा कोसळला आहे. याच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अनेक इमारतींना आग
शहराच्या मध्यभागी असलेले एका हॉटेलचे छत आणि अनेक इमारतींना हल्ल्यामुळे भीषण आग लागली आहे. परंतु हल्ल्यापूर्वी इशारा देण्यात आल्याने कीवचे हजारो रहिवासी स्वत:चे पाळीव प्राणी आणि महत्त्वाच्या सामग्रीसोबत भूमिगत मेट्रो स्थानकांमध्ये आश्रयासाठी पोहोचले होते. रशियाच्या हल्ल्यात कमीतकमी 11 जण गंभीर जखमी झाले असून यात 5 वैद्यकीय कर्मचारी सामील असल्याचे कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले आहे.
युक्रेनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर
युक्रेनने बुधवारी रशियात शिरून केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल रशियाने हा हल्ला केला आहे. युक्रेनच्या सैन्याने रशियातील तीन मोठ्या ठिकाणांना नष्ट केल्याची माहिती अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी दिली. युक्रेनने रशियाच्या उफा येथील तेल रिफायनरी, पेन्जा भागातील रशियाचा सैन्य परिसर आणि मॉस्को क्षेत्रातील रशियाचे एक सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटरला लक्ष्य केले आहे.