कुसूर-खानापूरमध्ये खळबळ; ग्रामपंचायतीची मुख्य जलवाहिनी फोडून शेतात पाणी वळविल्याचा उपसरपंचावर आरोप
कुसूर-खानापूर : ग्रामस्थांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला बेकायदेशीर जोडणी करून पाणी स्वतःच्या शेतातील विहिरीत वळविल्याच्या आरोपावरून कुसूर-खानापूरचे उपसरपंच रविंद्र आमसिद्ध माशाळे यांच्याविरोधात मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सार्वजनिक पाण्याच्या गैरवापराचा मुद्दा चर्चेत आला आहे.
याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल कांताप्पा कुंभार (वय ३८, रा. आचेगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात असताना ग्रामपंचायत सदस्य रमेश हेरकर, नानासाहेब बिराजदार, महानंदा हत्ताळे आणि उज्वला व्हनमाने यांनी उपसरपंच माशाळे हे ग्रामपंचायतीच्या मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइनमधून बेकायदेशीररीत्या पाणी घेऊन शेतीसाठी वापरत असल्याची तक्रार केली.
त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य आणि पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद शाळा, खानापूरच्या बाजूला असलेली मुख्य जलवाहिनी फोडून त्याला दुसरा पाइप जोडण्यात आल्याचे आणि त्याद्वारे पाणी शेतातील विहिरीत वळविण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत चौकशी केली असता, संबंधित पाइपलाइनची जोडणी उपसरपंच रविंद्र माशाळे यांनी केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, याबाबत उपसरपंचांना दूरध्वनीवरून विचारणा केली असता, संबंधित पाइप आपणच जोडल्याचे तसेच त्यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती अप्पर तहसीलदार, मंद्रूप आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला लेखी स्वरूपात देण्यात आली होती. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. या पाहणीतही बेकायदेशीर पाइप जोडणीद्वारे पाणी वळविल्याचे आढळून आल्याने पुढील कारवाई करण्याबाबत संबंधित विभागाने लेखी कळविले. अप्पर तहसीलदारांनीही गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिल्यानंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ई), ३२४ (३) तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८४ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांसाठी असताना त्याचा शेतीसाठी बेकायदेशीर वापर झाल्याचा आरोप समोर आल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, संबंधित उपसरपंचाविरोधात प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास मंद्रूपचे पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे करीत आहेत.
