For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कुशावती’ जिल्हा विकासपर्व प्रारंभ

01:28 PM Jan 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘कुशावती’ जिल्हा विकासपर्व प्रारंभ
Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून कुशावती जिल्हा निर्मितीची घोषणा : कुशावती नदीचे नाव सर्वदूर पोहोचवण्याचा संकल्प, लवकरच निर्माण होणार कुशावती जिल्हा पंचायत,प्रशासन पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती, पोलिस अधिकाऱ्यांसह वन अधिकारीही तैनात

Advertisement

पणजी : पवित्र गोमंतभूमीच्या कुशीत वसलेल्या आणि सर्वाधिक नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध अशा काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा या चार तालुक्यांचे युगानुयुगे उदर भरणपोषण करणाऱ्या कुशावती नदीचे स्मरण ठेवत सरकारने ‘कुशावती’ या नावाने राज्याच्या तिसऱ्या जिह्याची निर्मिती जाहीर केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. तिसऱ्या जिह्याचे नाव कुशावती असेल असे त्यांनी जाहीर केले. तमाम गोमंतकीयांनी या घोषणेचे हार्दिक स्वागत केले.

कुशावती नाव सर्वदूर पोहोचणार

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी, तिसऱ्या जिह्याला कुशावती नाव देण्यामागील भौगोलिक, नैसर्गिक आणि जैववैविधतापूर्ण कारणे आणि त्यांचे महत्व विशद केले. हे नाव देण्यामागील व्यवहारिक दृष्टीकोनही त्यांनी स्पष्ट केला. सध्या जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या कुशावती नदीचे नाव या जिह्याच्या माध्यमातून वारंवार लोकांच्या तोंडी घोळेल व त्या नदीची भौगोलिक ओळख सर्वदूर पोहोचेल. त्याचा फायदा पर्यटन वाढीस होईल, या भागात पर्यटक येतील व त्यायोगे स्थानिक अर्थव्यवस्थेस हातभार लाभेल, असे ते म्हणाले.

लवकरच होणार जिल्हा पंचायत

एवढेच नव्हे तर या जिल्हा निर्मितीचा भविष्यात जिल्हा पंचायतीलाही लाभ होणार आहे. लवकरच त्यांनाही स्वतंत्र कार्यक्षेत्र मिळणार आहे. तसेच या जिह्याचेही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नियुक्त करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र तोपर्यंत सर्व व्यवहार दक्षिण गोव्यातूनच होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘कुशावती’ची अधिसूचना जारी

कालच कुशावती जिह्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या जिह्यासाठी जिल्हाधिकारी आणि तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील. या विषयी स्वतंत्र अधिसूचना जारी झाली आहे. या जिह्याचे मुख्यालय केपे असणार आहे. असे असले तरी केपेत पूर्ण वेळ कार्यालय स्थापन होईपर्यंत या जिह्याचा ताबा दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहणार आहे. सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाल्यानंतर मंगळवारी सरकारने तिसऱ्या जिह्याला मान्यता दिली होती. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी घोषणा केली होती.

कुशावती जिह्यात येणारे तालुके व गाव

केपे :- आमोणे, अवेडे, असोल्डे, अडणे, आंबावली, बाळ्ळी, बेंदोर्डे, बार्से, चैफी, कोठंबी, काकोडा, कावरे, कोर्डे, कोर्ला, काजुर, कुडचडे, कुस्मणे, दिवो, फातर्पा, गोकुल्डे, होडार, मोरपिर्ला, मलकपण, मळकर्णे, मायणा, मानगाळ, नाकेरी, नागवे, पाडी, पिर्ला, किटल, खेडे, केपे, किसकोण, शिरवई, सुळकर्णा, तिळोय, उंदोर्णा, शेल्डे, शेळवण, झीक शेळवण, झानोडे.

सांगे :- अंतरे, भाटी, भोम, काळे, कोळंब, कोंप्रोय, खणगिणी, कष्टी, कोटार्ली, कुंबारी, कुर्डी, डोंगोर, डोंगुर्ली, दुधाळ, कुर्पे, मावळींगे, मुगाळी, नायकिणी, नेत्रावळी, नुंदें, ओशेल, पाटये, पोट्टे, पोट्रे, रिवण, रूमडे, साळावली, सांगे, सातोण, सावर्डे, शिगोणे, तुडल, उगें, वेर्ले, विचुंद्रे, वलीयन, शेळपें.

धारबांदोडा :- आग्लोट, बांडोळी, कामरखण, करंझोळ, कोडली, कुळे, कार्मोणे, धारबांदोडा, म्हैसाळ, मोले, पिळये, साकोर्डा, सांगोड, शिगाव, सोनावली, सुर्ला.

काणकोण :- आगोंदा, अंजदिव, काणकोण, चावडी, खोला, खोतीगाव, गावडोंगरी, लोलयें, नगर्से-पाळोळे, पैंगीण.

अधिकारी नियुक्तीचा आदेश

कुशावती जिह्यासाठी अधिकारी नियुक्त करणारा आदेश सरकारकडून जारी करण्यात आला आहे. त्यात जिल्हाधिकाऱ्यासह  पाच उपजिल्हाधिकारी, तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी व चार उपविभागीय अधिकारी यांचा समावेश आहे. यातील बहुतेक अधिकारी हे विद्यमान दक्षिण गोवा जिह्यातील समपद असून त्यांच्याकडे नवीन जिह्याचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. त्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून श्रीनेत कोठवळे, रमेश गांवकर, विशाल कुंडईकर, उपजिल्हाधिकारी शर्मिला गांवकर, उपजिल्हाधिकारी वेल्टॉन तेलीस, उपजिल्हाधिकारी प्रजित चोडणकर, उपजिल्हाधिकारी (डीआरओ), आवेलिना ई परेरा, उपजिल्हाधिकारी महसूल रोहन लोलयेकर, उपजिल्हाधिकारी आदिवासी कल्याण गीता गांवकर, पंचायत उपसंचालक प्रसिद्ध नाईक, अतिरिक्त पंचायत संचालक (2) मान्युएल बार्रेटो, वन दावे अधिकारी दीपक वायंगणकर, प्रकल्प अधिकारी मेडोरा डिकॉस्टा, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक दीपाली नाईक, यांचा समावेश आहे.

टिकम सिंग वर्मा पोलिस अधीक्षक

कोकण रेल्वे पोलिस अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा हे आज 1 जानेवारी 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत कुशावती जिह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांच्या स्वत:च्या कर्तव्यांव्यतिरिक्त पदभार सांभाळतील आणि पुढील व्यवस्था होईपर्यंत अधिकारी दक्षिण-गोवा जिह्यातील विद्यमान कार्यालयातून कर्तव्ये पार पाडत राहतील, असा आदेश कार्मिक खात्याचे अंडर सेक्रेटरी रघुराज फळदेसाई यांनी काढला आहे.

संतोषकुमार रेड्डी वन्यजीव उपसंरक्षक

भारतीय वन सेवा क्षेत्रातील दक्षिण गोवा वन विभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी संतोष कुमार रेड्डी हे 1 जानेवारी 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत कुशावती जिह्याचे  वन विभागाचे वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन उपसंरक्षक म्हणून कर्तव्य पार पाडणार आहेत.

Advertisement
Tags :

.