कुसाळे, एलावेनिल भारतीय नेमबाजी संघात
वृत्तसंस्था/ म्युनिक
पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता स्वप्निल कुसाळे मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या आयएसएसएफ विश्वचषकात पुनरागमन केलेला नेमबाज इलावेनिल वलरिवनसह भारतीय संघाचे नेतृत्व करेल. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्सचा समावेश असेल.
कुसाळेने स्थानिक सर्किटवर केलेल्या चांगल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पुऊषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स (3पी) स्पर्धेत पुनरागमन केले आहे. दोन वेळा ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेली इलावेनिल पॅरिसनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिसणार आहे. तिने ‘आरपीओ’ (रँकिंग पॉइंट्स ओन्ली) नेमबाज म्हणून ब्युनोस आयर्स आणि लिमाचा दौरा केला होता. महिला एअर पिस्तूलमध्ये आशियाई खेळांतील विजेती पलक देखील संघात परतली आहे. महिला एअर रायफलमधील राष्ट्रीय विजेती अनन्या नायडूसारख्या काही खेळाडू या स्पर्धेतून विश्वचषकात पदार्पण करतील.
पुऊषांच्या एअर पिस्तूलमध्ये दोन नवीन चेहरे आदित्य मालरा आणि निशांत रावत झळकतील. ऑलिंपिक विजेते, जागतिक विजेते आणि 78 देशांमधील या खेळातील दिग्गजांसह एकूण 695 खेळाडू विश्वचषकात सहभागी होतील. या हंगामाची सुऊवात दक्षिण अमेरिकेत झालेल्या स्पर्धेने झाला। जिथे भारतीय रायफल आणि पिस्तूल नेमबाजांनी सहा सुवर्णांसह 15 पदके जिंकली. यामुळे संघाला क्रमवारीत अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवण्यास मदत झाली. तथापि, जगातील सर्वोत्तम नेमबाजांची उपस्थिती जास्त असल्याने म्युनिकचा टप्पा खूपच कठीण आव्हान उभे करेल.
25 मीटर रॅपिड-फायर पिस्तूलमध्ये विद्यमान ऑलिंपिक विजेता आणि तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये पदके मिळविणारा दिग्गज चिनी नेमबाज ली युहोंग आणि 20 वर्षीय ऑलिंपिक, जागतिक आणि आशियाई विजेता तसेच विश्वविक्रमधारक शेंग लिहाओ हे या स्पर्धेत भाग घेतील. पहिल्या दोन टप्प्यांतील विजेत्या चीनने त्यांचा पुऊष एअर पिस्तूलमधील ऑलिंपिक विजेता झी यू यालाही 22 सदस्यीय संघात आणले आहे. यजमान जर्मनीने त्यांचा पिस्तूल प्रकारातील दिग्गज नेमबाज आणि माजी ऑलिंपिक तसेच विश्वविजेता ख्रिश्चन रिट्झ याच्या नेतृत्वाखाली 27 सदस्यीय मजबूत पथक उतरवले आहे.