कुसल मेंडीस, चंडिमल यांची अर्धशतके
दुसरी कसोटी, लंका प. डाव 9 बाद 229, स्टार्कचे 3 बळी
वृत्तसंस्था / गॅले
गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या बलाढ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत यजमान लंकेने दिवसअखेर पहिल्या डावात 9 बाद 229 धावा जमविल्या. दिनेश चंडीमल आणि कुसल मेंडीस यांच्या अर्धशतकामुळे लंकेचा डाव सावरला. लंकेच्या दिमुथ करुणारत्नेची निवृत्तीपूर्वीची ही शेवटची कसोटी आहे. ऑस्ट्रेलियाच्या लायन आणि स्टार्क यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
या मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने केवळ तीन दिवसांत जिंकताना लंकेचा डावाने मोठा पराभव केला होता. या पहिल्या सामन्यात लंकेला फॉलोऑनची नामुष्की पत्करावी लागली होती. दुसऱ्या कसोटीत लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत लंकेला फटकेबाजीपासून चांगलेच रोखले. निशांका आणि करुणारत्ने यांनी सलामीच्या गड्यासाठी 23 धावांची भागिदारी केली. नाथन लायनने निशांकाला 11 धावावर त्रिफळाचित केले. करुणारत्ने आणि चंडीमल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. उपाहारापर्यंत लंकेने 30 षटकात 1 बाद 87 धावा जमविल्या होत्या.
खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर लंकेचे शतक 231 चेंडूत फलक लागले. लायनने करुणारत्नेचा त्रिफळा उडविला. त्याने 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. लायनने लंकेला आणखी एक धक्का देताना मॅथ्युजला केवळ एका धावेवर तंबुत धाडले. हेडने कमिंदु मेंडीसला स्मिथकरवी झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. कर्णधार धनंजय डिसिल्वा खाते उघडण्यापूर्वी स्टार्कच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. चहापानावेळी लंकेची स्थिती 58 षटकात 5 बाद 144 अशी होती. चंडीमलने एका बाजुने संघाचा डाव सावरत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 105 चेंडूत अर्धशतक झळकविले. चहापानावेळी तो 70 धावांवर खेळत होता.
चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रामध्ये लंकेने आणखी 4 गडी गमविताना 79 धावा जमविल्या. कुहेनमनने चंडीमलला कॅरेकरवी यष्टीचित केले. त्याने 163 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 74 धावा जमविल्या. चंडीमल बाद झाल्यानंतर कुसल मेंडीस आणि रमेश मेंडीस यांनी सातव्या गड्यासाठी 65 धावांची भागिदारी केली. स्टार्कने रमेश मेंडीसला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 28 धावा केल्या. स्टार्कने प्रभात जयसुर्याला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. तर कुहेनमनने पेरीसचा त्रिफळा उडविला. कुसल मेंडीस 1 षटकार आणि 6 चौकारांसह 59 धावांवर खेळत असून कुमाराने अद्याप खाते उघडले नाही. ऑस्ट्रेलियातर्फे लायन आणि स्टार्क यांनी प्रत्येकी 3 तर कुहेनमनने 2 आणि हेडने 1 गडी बाद केला. कुसल मेंडीसने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 4 चौकारांसह 90 चेंडूत झळकविले.
संक्षिप्त धावफलक: लंका प. डाव 90 षटकात 9 बाद 229 (चंडीमल 74, करुणारत्ने 36, निशांका 11, कमिंदु मेंडीस 13, कुसल मेंडीस खेळत आहे 59, रमेश मेंडीस 28, अवांतर 7, स्टार्क 3-37, लायन 3-78, कुहेनमन 2-53, हेड 1-31)