तुर्कियेत कुर्दिश गटाकडून शस्त्रसंधी करार
► वृत्तसंस्था / अंकारा
तुर्किये या देशातील कुर्दिश बंडखोरांनी प्रशासनाशी शस्त्रसंधी करार केला आहे. गेली 40 वर्षे हे बंडखोर तेथील केंद्रीय सरकारशी त्यांच्या स्वायत्ततेसाठी संघर्ष करीत होते. मात्र आता त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सरकारशी समझोता केला आहे. हा समझोता यशस्वी ठरल्यास या देशासमोरची एक महत्वाची समस्या सुटणार आहे. कुर्दिश लोकांची संघटना पीकेकेच्या वतीने या करारावर शनिवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 40 वर्षांमध्ये कुर्दिश बंडखोर आणि सरकार यांच्या संघर्षात 40 हजारांहून अधिक नागरीकांचा बळी गेला आहे.
पीकेके या संघटनेला तुर्किये आणि काही पाश्चिमात्य देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता या संघटनेने शस्त्रे खाली ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तुर्किये देशाच्या अग्येय भागात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. हा भाग इराक या देशाला लागून असून इराकमध्येही काही भागांमध्ये कुर्दिश लोकांचे प्राबल्य आहे. इराकच्या तुर्कियेला लागून असलेल्या डोंगराळ भागांमध्ये अनेक कुर्दिश टोळ्यांचे वास्तव्य आहे. या टोळ्यांच्या सहकार्यावर या शांतता कराराचे भवितव्य अवलंबून आहे, असे तज्ञांचे मत आहे.