पाकिस्तानी सैनिकांच्या ‘एलओसी’जवळ कुरापती
बंकर्स उभारणीचा डाव उधळला : भारतीय सैनिकांनी गोळीबार करताच काढला पळ
वृत्तसंस्था/ श्रीनगर, नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ म्हणजेच एलओसीजवळ पाकिस्तान रेंजर्सचा नापाक कट भारतीय लष्कराने हाणून पाडला. बांदिपोरा जिह्यातील गुरेझ सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ नौशहरानादमध्ये सुमारे 30 ते 40 पाकिस्तानी सैनिक उपस्थित असल्याचे लष्कराच्या जवानांना आढळून आले. नियंत्रण रेषेवरील कुंपणाजवळ पाकिस्तानी लष्कराकडून सुरू असलेले बांधकाम रोखण्यासाठी भारतीय लष्कराने गोळीबार केला. लाल झेंडा दाखवून पाक लष्कराला सतर्क करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानी जवानांनी घटनास्थळावरून पळ काढला.
पाकिस्तान सतत काही ना काही कुरापती काढण्याचे काम करत असतो. यावेळी नौशहरानादमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यासोबत बरीच उपकरणे दिसत होती. तसेच बंकर बनवण्याची तयारी सुरू होती. यानंतर हलक्मया शस्त्राने दोन राऊंड गोळीबारही करण्यात आला. त्यानंतर तेथील बांधकाम थांबवून सैनिक परतले. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानी लष्कराच्या नेतृत्त्वात हे बांधकाम केले जात असताना भारतीय सैनिकांनी गोळीबाराचा इशारा देताच पाकिस्तानी सैनिक हादरून पळून गेले.
भारतीय लष्कराच्या इशाऱ्यानंतर बांधकाम थांबवण्यात आल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीरमधील गुरेझ सेक्टरमध्ये शनिवारी गोळीबाराची घटना घडली. अद्याप संपूर्ण माहिती समोर आली नसली तरी पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला आहे. भारतीय हद्दीत घुसण्यासाठी दहशतवादी जुन्या पारंपरिक मार्गांनी पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुरक्षा दलांची कारवाई
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कर एलओसीवर फायदा घेण्यासाठी हे बंकर बनवत होते. हिवाळा येण्यापूर्वी भारतीय सीमेवरून जम्मू-काश्मीरमध्ये जास्तीत जास्त दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याची पाकिस्तानची जुनी सवय आहे. भारतीय लष्कर शक्मय तितकी गस्त घालून अशा कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न करते.