कुपवाडमध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह उघड; सहा जणांवर गुन्हा दाखल; नववीत शिकणाऱ्या मुलीचे लग्न लावून दिल्याचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कुपवाड येथे आई व दोन बहिणींसोबत राहत होती. तिचे वडील मयत असून ती नववीत शिक्षण घेत होती. 14 मे 2026 रोजी रात्री सुमारे दहाच्या सुमारास चुलता, चुलत आजी, पती, सासरा आणि दीर यांच्या उपस्थितीत तिचा विवाह लावून देण्यात आला. त्यावेळी ती अल्पवयीन असल्याची माहिती संबंधितांना होती, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे.
विवाहानंतर पतीसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर त्याने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचेही तिने नमूद केले आहे. सप्टेंबर महिन्यात ती कुपवाड येथील माहेरी आली होती. 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सांगली जिल्हा बाल मदत केंद्राची टीम तिच्या घरी आली. बालविवाहाबाबत विचारणा केल्यानंतर तिने विवाह झाल्याची माहिती दिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
अल्पवयीन असल्याची माहिती असूनही विवाह लावून दिल्याचा आरोप करत पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार आई, चुलता, चुलत आजी, पती, सासरा आणि दीर अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बी. बी. पवार करीत आहेत.
