कुणकेरी शाळा नं. ३च्या ‘ताराराणी’ बुलबुल पथकाची राज्यस्तरीय पुरस्कारावर मोहोर
ओटवणे प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकेरी नं. ३च्या ‘ताराराणी’ बुलबुल पथकाने राज्यस्तरीय बुलबुल पुरस्कार चाचणीत उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे. मार्च २०२६मध्ये सोनतळी, कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बुलबुल पुरस्कार चाचणी परीक्षेत पथकातील सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्रता प्राप्त केली.
विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरीय परीक्षेसाठी सहभागी झालेले हे एकमेव बुलबुल पथक होते. इयत्ता तिसरी आणि चौथीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले.
प्लॉक लिडर सौ. निता नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदी विश्राम सावंत, निष्ठा उत्तम सावंत, लावण्या अनिल धुरी, रिशिता राजाराम धुरी, ध्रुवी नागेश सावंत, सई तानाजी सावंत, त्रिशा तेजस गावडे, प्रिया शंकर राणे आणि समृद्धी सचिन चव्हाण यांनी राज्यस्तरीय बुलबुल पुरस्कारासाठी पात्रता मिळवली.
याचबरोबर शाळेच्या ‘शिवरत्न संभाजी कब’ पथकातील चैतन्य उत्तम सावंत आणि स्वराज प्रदीप सावंत या विद्यार्थ्यांनीही कब राज्य पुरस्कारासाठी पात्रता मिळवली आहे.
या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक मिंगेल मान्येकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कब मास्टर नितीन नामदेव सावंत यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
कुणकेरी शाळेच्या या राज्यस्तरीय यशाबद्दल कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप निऊंगरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा विनया सावंत, आंबेगाव शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप म्हाडगुत, कुणकेरी गावच्या सरपंच सोनिया सावंत, अंगणवाडी सेविका मंगल आशा सावंत, स्काऊट-गाईड जिल्हा संघटक अंजली माहुरे तसेच पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.