For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी आदिवासी कुटुंबांना दिलासा; 21 कुटुंबांना घरकुलांसह सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा सुविधा

08:12 PM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी आदिवासी कुटुंबांना दिलासा  21 कुटुंबांना घरकुलांसह सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा सुविधा
Advertisement
कुंभारमाठ : अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या कुंभारमाठ येथील 21 कातकरी आदिवासी कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या पीएम जनमन (PM JANMAN) योजनेंतर्गत या कुटुंबांना घरकुलांचा लाभ मिळवून देण्यात आला असून, आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देत आदिवासी वस्तीतील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील या कातकरी आदिवासी कुटुंबांची अनेक वर्षे झोपड्यांमध्ये गुजराण सुरू होती. पीएम जनमन योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ मिळाल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला.

Advertisement

मे 2026 मध्ये पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाच्या सहकार्याने संबंधित वस्तीमध्ये विंधन विहिरीची खोदाई करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून सौरऊर्जेवर चालणारा ऑटो पंप, पाण्याची टाकी आणि स्टँड पोस्ट उभारण्यात आले. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर या पाणीपुरवठा सुविधेचे लोकार्पण माजी उपसभापती मधुकर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता असताना ही सुविधा उपलब्ध झाल्याने वस्तीतील 21 कातकरी आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. सौरऊर्जेवर आधारित यंत्रणेचा वापर केल्यामुळे पर्यावरणपूरक पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्नही ग्रामपंचायतीने केला आहे.

Advertisement

या लोकार्पणप्रसंगी सरपंच पूनम मनोज वाटेगावकर, समिती सदस्या मानसी भोगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर, दिव्या मिसाळ, अनिता गांवकर, सोनाली डिचवलकर, माजी उपसरपंच पंढरीनाथ ऊर्फ बाळा माने तसेच वस्तीतील कातकरी आदिवासी कुटुंबांतील नागरिक उपस्थित होते.

वीजजोडण्या आणि पथदिव्यांसाठीही नियोजन

घरकुले आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर ग्रामपंचायत कुंभारमाठने आता या वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील नियोजन केले आहे. महावितरणच्या सहकार्याने प्रत्येक घराला वीजजोडणी उपलब्ध करून देणे, तसेच संपूर्ण वसाहतीत पथदिव्यांची व्यवस्था करणे, यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना राबविण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे.

शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने केलेला हा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे. निवारा आणि पाण्याच्या सुविधांनंतर वीजजोडण्या व पथदिवे उपलब्ध झाल्यास या कातकरी आदिवासी कुटुंबांच्या जीवनमानात अधिक सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.