Konkan-Ghat Road: कोकण-घाटमाथा जोडणारा घाट धोकादायक, संरक्षक भिंत कोसळली, रेलिंग निखळले
खचलेल्या रस्त्यावर दगड, पिंप उभे करुन तात्पुरती मलमपट्टी
चिपळूण : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी पहाटे संरक्षक भिंत कोसळली असून या भागातील लोखंडी रेलिंगही निखळले आहे. घाटात खोल दरीच्या बाजूने असलेली ही भिंत कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पोलिसांकडून खचलेल्या ठिकाणी दगड, पिंप उभे करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे.
या घाटात गेल्या 2 वर्षात कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला आहे. यामध्ये संरक्षक भिंतीसह रस्ता दुरुस्तीचा समावेश आहे. मात्र कितीही कोटी या घाटातील दुरुस्तीवर, सुरक्षेच्या उपाययोजनांवर खर्च केले तरीही पावसाळ्यात दरवर्षी हा घाट धोकादायक बनत आला आहे. दरड कोसळणे, केलेली बांधकामे ढासळणे हे नित्याचेच झाले आहे.
शनिवारी कोसळलेल्या संरक्षक भिंतीमुळे यावर्षीचा पावसाळा कसा जाणार, याचीच चिंता वाहनचालकांना लागून राहिली आहे. या घाटातून दररोज शेकडो वाहने जात-येत असतात. सध्या घाटात तीन ठिकाणी रस्ता खचण्याचे व संरक्षक भिंत कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. सद्यस्थितीत खचलेल्या रस्ता ठिकाणी वाहने जाऊ नयेत म्हणून तेथे फक्त दगड आणि काही ठिकाणी पिंप उभी करून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.
पावसाळ्यात हा रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच पावसाळ्यात अवजड वाहतूक असणाऱ्या घाट परिसरात आधीच दृश्यमानता कमी झाल्याने अवजड वाहनांसह मोठी वाहतूक कोंडी होते. त्यात आता रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या संरक्षक भिंतीसह रेलींगही निखळल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, प्रशासनाने अद्याप कोणतीही मोठी यंत्रसामुग्री पाठवली नसल्याने स्थानिकांनी उच्च आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.