कुंभमेळा सुरक्षा केली अधिक कठोर
महनीय व्यक्तींसाठी प्रवेशपत्रिका रद्द, मेळा परिसरात वाहनांना पूर्ण बंदी, भाविकांनाही सूचना
वृत्तसंस्था/प्रयागराज
बुधवारी महाकुंभमेळा परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी अधिक कठोर सुरक्षा व्यवस्था केली आहे. अतिमहनीय व्यक्तींना दिली जाणारी प्रवेशपत्रे रद्द करण्यात आली आहेत. तसेच मेळा क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या वाहनांना पूर्णपणे बंदी घोषित करण्यात आली आहे. या दुर्घटनेत 30 भाविकांचा मृत्यू झाला असून 60 भाविक जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून येण्याचे आणि जाण्याचे मार्ग वेगवेगळे करण्यात आले आहेत. तसेच मेळा क्षेत्रात गर्दी कमी करण्यासाठी उपाय योजना करण्यात आली आहे. 2019 च्या कुंभमेळ्यात ज्या अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी केली होती, त्या अधिकाऱ्यांना पुन्हा व्यवस्थापनासाठी बोलाविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी दिली. या अधिकाऱ्यांना विशेष उत्तरदायित्व देण्याची योजना प्रशासनाने केली आहे.
रहदारी नियम लागू
भाविकांच्या येण्या-जाण्याच्या मार्गांवर रहदारी नियम लागू करण्यात आले आहेत. सर्व मार्ग एकेरी (वन वे) बनविण्यात आले आहेत. तसेच जाण्यासाठी आणि संगम क्षेत्रात येण्यासाठी वेगवेगळे मार्ग बनविण्यात आले असून भाविकांना या मार्गांची माहिती देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच रहदारी नियंत्रणासाठी आणखी पोलीस आणि सुरक्षाकर्मींची नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच राष्ट्रीय आपदा निवारण दलांना सदैव सर्तक राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री स्वत: रात्रंदिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
शेजारच्या जिल्ह्यांवरही बंधने
प्रयागराज शेजारच्या जिल्ह्यांमधून येणाऱ्या वाहनांवरही बंदी घालण्यात आली असून कुंभमेळ्याचे भाविक वगळता अन्य कारणांसाठी प्रयागराज येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. भाविकांना हालचालींसाठी मोकळी जागा जास्तीत जास्त उपलब्ध व्हावी, यासाठी योजना लागू करण्यात आली आहे. तसेच एकाच घाटावर भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी सातत्याने सूचना दिल्या जात असून सर्व घाटांचा समान रितीने उपयोग व्हावा यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जखमींच्या प्रकृतीत सुधारणा
बुधवारच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या 60 भाविकांवर उपचार करण्यात येत असून त्यांच्यापैकी अनेकांची प्रकृती आता सुधारत असल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काहींची प्रकृती अद्यापही चिंताजनक असली तरी अनेकजण आता धोक्याच्या बाहेर आहेत. त्यांना लवकरच घरी पाठविण्यात येणार आहे. जखमींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. त्यांची अधिक दक्षता घेण्यात येत आहे. प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी उपचारांवर लक्ष ठेवून आहेत.
चौकशीस प्रारंभ
दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला होता. न्यायालयीन आयोगाची रचना करण्यात आली असून या आयोगाने चौकशीच्या कामाला प्रारंभ केला आहे. लवकरच आयोग घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या चौकशीसह प्रयागराज नागरी प्रशासनही स्वत:ची स्वतंत्र चौकशी करीत आहे. विशेषत: बॅरिकेडस् तुटण्याच्या किंवा तोडल्याच्या प्रकाराची चौकशी बारकाईने केली जाईल. तसेच अधिकाऱ्यांकडून भीती पसरविण्यात आली का, हेही तपासले जाईल. घातपाताची शक्यताही गृहित धरुन चौकशी केली जाईल. या घटनेत घातपाताच्या शक्यतेचे सुतोवाच मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी बुधवारी रात्री केले होते.