बेंगळुरात विमानांचा कुंभमेळा!
संरक्षणमंत्री राजनाथ यांच्याकडून एअरो इंडिया शोची प्रयागराजमधील कुंभमेळ्याशी तुलना
प्रतिनिधी/ बेंगळूर
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळूरमध्ये सुरु असलेल्या एअरो इंडिया शोची तुलना प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याशी केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अध्यात्माचा महाकुंभ मेळा सुरु आहे, तर येथे विमानांचा महाकुंभ मेळा होत असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
सोमवारी बेंगळूरच्या यलहंका येथील वायूदलाच्या विमानतळावर आयोजित एअरो इंडिया शो-2025 चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. प्रयागराजमधील महाकुंभ हा अंतरंगातील अध्यात्मिक शक्तीचे द्योतक आहे, तर यलहंका विमानतळावरील एअरो शो हा विमानांचा कुंभ आमच्या संरक्षण शक्तीचे प्रदर्शन आहे. संशोधन, अविष्कार, तंत्रज्ञान आणि लष्करी साहित्योपकरणांचा मेळा येथे भरला आहे, असे वर्णन त्यांनी केले.
एअरो इंडिया शो हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकास भी, विरासत भी’ या घोषणेशी सुसंगत आहे. शांती आणि शक्ती हा आमचा मंत्र बनला पाहिजे. नव्या आव्हानांची उत्तरे शोधण्यासाठी परिश्रम घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
अत्याधुनिक संशोधनाद्वारे एक पाऊल पुढे
विमान वाहतूक क्षेत्रात अत्याधुनिक संशोधनाद्वारे आम्ही पावले पुढे टाकली आहेत. भारताच्या संरक्षण सामर्थ्याचे प्रदर्शन एअरो इंडिया शोच्या माध्यमातून होईल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली मागील 10 वर्षात भारताने विमाने निर्मिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बरेच काही साध्य केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आम्ही संरक्षण क्षेत्रासाठी अधिक तरतूद केली आहे. संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणावरही अधिक भर दिला आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
संरक्षण आता अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे क्षेत्र
संरक्षण क्षेत्र यापूर्वी प्राधान्य क्षेत्र मानले जात होते. आता संरक्षण क्षेत्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे क्षेत्र म्हणून रुपांतर होत आहे. बेंगळूर तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, माहिती तंत्रज्ञान, अविष्काराची नगरी म्हणून परिचित आहे. आता या शहराने विमानो•ाण क्षेत्रातही लौकिक मिळविला आहे, असे गुणगाण संरक्षणमंत्र्यांनी केले.
याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांसह विविध देशांचे संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख उपस्थित होते.