काँग्रेस चिंतन बैठकीला कुमारी सेलजा अनुपस्थित
वृत्तसंस्था/चंदीगढ
हरियाणात काँग्रेसचा पराभव कसा झाला, यासंबंधी काँग्रेस पक्षात चिंतन सुरु झाले आहे. पराभवाच्या कारणांचे विश्लेषण करण्यासाठी येथे काँग्रेस नेत्यांची एक बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत ज्येष्ठ दलित नेत्या कुमारी सेलजा आणि काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थिती न दर्शविल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. हरियाणात मोठा विजय मिळेल अशी काँग्रेसची अपेक्षा होती. निवडणूकपूर्व सर्वेक्षणे आणि मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्येही हीच शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तथापि, मतगणनेत प्रारंभीच्या आघाडीनंतर काँग्रेस पक्ष सातत्याने मागे पडत गेला आणि अखेरीस तो बहुमतापासून बराच दूर राहिल्याचे दिसून आले. या राज्यात भारतीय जनता पक्षाने सलग तीनदा विजय मिळवून हॅटट्रिक साध्य केली.
कारणे शोधण्याचा निर्धार
या अनपेक्षित पराभवाची कारणे शोधली जातील, असे राहुल गांधी यांनी मतगणना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्पष्ट केले होते. त्यानुसार गुरुवारी काँग्रेसच्या नेत्यांची प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हु•ा उपस्थित होते. तथापि सेलजा आणि सुरजेवाला हे दोन प्रबळ नेते उपस्थित न राहिल्याने तो राजकीय चर्चेचा विषय झाला आहे. सेलजा यांनी या पराभवासाठी पक्षातील दोन नेत्यांना अप्रत्यक्षपणे जबाबदार धरले होते. निवडणुकीचा परिणाम समोर येत असताना त्यांनी तसे विधानही केले होते. गुरुवारच्या बैठकीत सेलजा आणि सुरजेवाला यांना आमंत्रण नव्हते, की असूनही त्यांनी बैठकीकडे पाठ फिरविली, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, पराभवाची जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल असे संकेत देण्यात येत आहेत.
मुख्य कारण कोणते?
काँग्रेसमधील अंतर्गत दुफळी आणि नेत्यांमधील संघर्ष हे पराभवाचे मुख्य कारण आहे काय, याचा प्रामुख्याने शोध घेतला जाणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबंधीही पुढील बैठकांमध्ये विचार केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला असताना, काही नेते प्रचारापासून दूर राहिल्याचे दिसून आले होते. तसेच अनेक मतदारसंघांमध्ये पक्षाला बंडखोरीची लागण झाली होती. ही बंडखोरी कोणामुळे झाली आणि पराभवासाठी पक्षातीलच काही नेत्यांची भूमिका कारणीभूत होती काय, यावरही काँग्रेसचे श्रेष्ठी विचारमंथन करणार आहेत. गुरुवारच्या बैठकीत पुढील बैठकांची रुपरेषा ठरविण्यात आल्याचे समजते.