मणिपूरमध्ये कुकी संघटनांचा अनिश्चित काळासाठी बंद
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये मुक्त वाहतूक संचाराच्या पहिल्या दिवशी शनिवारी सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात एकाचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले. 8 मार्चपासून राज्यातील सर्व भागात सामान्य रहदारी पुन्हा सुरू झाली असतानाच कुकी समुदायाच्या लोकांनी त्याला जोरदार विरोध केला. शनिवारी सुरक्षा दलांच्या कारवाईच्या विरोधात कुकी संघटनांनी अनिश्चित काळासाठी बंद पुकारल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी सकाळी कांगपोकपी जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता दिसून येत होती. जाळपोळ आणि हिंसाचार टाळण्यासाठी येथे अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
मणिपूरमध्ये जवळजवळ दोन वर्षांनी कुकी आणि मैतेईबहुल भागात मुक्त वाहतूक सुरू होताच शनिवारी हिंसाचार उफाळला. इंफाळ, चुराचंदपूर, कांगपोकपी, बिष्णुपूर आणि सेनापतीला जोडणाऱ्या रस्त्यांवर बसेस धावू लागताच कुकी समुदायाच्या लोकांनी निषेध करत वाहतूक बंद पाडली होती. यावेळी आंदोलकांनी रस्त्यांवर दगडफेक करून वाहतूक रोखली. रस्त्यांच्या आजूबाजूची झाडे तोडून रस्ते अडवण्यात आले. अनेक ठिकाणी वाहने पार्क करून रस्ते बंद करण्यात आले होते. इतकेच नाही तर काही बसेस आणि गाड्यांना आगही लावण्यात आली. हिंसाचार करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात शेकडो लोक जखमी झाले आहेत. याबाबत मणिपूर पोलिसांनी एका निवेदन जारी करत निदर्शकांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यासाठी आंदोलकांकडून गोफणींचा देखील वापर करण्यात आला आहे. या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या 5 वाहनांच्या काचा फुटल्या. या संघर्षादरम्यान 20 हून अधिक निदर्शक जखमी झाले. तसेच एका निदर्शकाचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला.
महामार्गावर गस्त वाढवली
सध्या जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग-2 (इम्फाळ-दिमापूर रोड) वर सुरक्षा दलाची गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच इतर भागातही अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाहनांद्वारे गस्त घातली जात आहे.
‘आयटीएलएफ’चा बंदला पाठिंबा
कुकी संघटनेने जाहीर पेलेल्या अनिश्चित काळासाठीच्या बंदला ‘द इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम’ने (आयटीएलएफ) पाठिंबा दर्शवला आहे. शनिवारी झालेल्या निदर्शनात सहभागी झालेल्या लोकांचा आम्ही आदर करतो, असे संघटनेने म्हटले आहे. तसेच लोकांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन ‘आयटीएलएफ’कडून करण्यात आले आहे.
सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करावा : कुकी
कुकी झोरोस्ट्रियन कौन्सिलने (केझेडसी) शनिवारच्या संघर्षात 50 हून अधिक महिला जखमी झाल्याचे म्हटले आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या बळाच्या वापरामुळे आमचा निर्धार आणखी दृढ झाला आहे. परिषद शांततेचे समर्थन करते परंतु शांतता लादल्याने असंतोष आणि संघर्ष निर्माण होईल, असे कुकी संघटनेने म्हटले आहे. आम्ही सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करतो. कोणत्याही अनुचित घटनेसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. दोन्ही समुदायात कायमस्वरूपी शांतता आणण्यासाठी राजकीय तोडगा निघत नाही तोपर्यंत सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.