कुडली-चिपळूण एसटी बसचा अपघात: स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस शेतात घुसली, चार प्रवासी किरकोळ जखमी, तर एक गंभीर जखमी
कुडली येथे मुक्कामी असलेली ही एसटी बस सकाळी प्रवासी आणि विद्यार्थ्यांना घेऊन चिपळूणच्या दिशेने जात होती. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास शीर आंबेकरवाडी परिसरात बसच्या स्टेअरिंगचा रॉड अचानक तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याशेजारील शेतात घुसली. या घटनेत चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, तर एका प्रवाशाला अधिक मार लागल्याचे समजते.
एसटीच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह
या अपघातामुळे एसटी बसच्या नियमित तपासणी आणि देखभाल-दुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. बस फेरीसाठी रवाना होण्यापूर्वी तिची तांत्रिक तपासणी करण्यात आली होती का, कार्यशाळेत योग्य प्रकारे देखभाल-दुरुस्ती केली जाते का, याची चौकशी होण्याची गरज आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी महामंडळाने बसची नियमित तांत्रिक तपासणी आणि देखभाल गांभीर्याने करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या अपघाताच्या कारणांची एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.