रशियासोबत कुडनकुलम आण्विक ऊर्जा प्रकल्पासंबंधी करार
रशिया विशेष भागीदार असल्याचे जयशंकर यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ मॉस्को
भारत आणि रशियाने तामिळनाडूतील कुडनकुलम आण्विक ऊर्जा प्रकल्पाच्या भविष्यातील वीजनिर्मिती युनिट्सच्या निर्मितीशी संबंधित काही अत्यंत महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत अशी माहिती विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. 5 दिवसीय रशियाच्या दौऱ्यावर असलेले जयशंकर यांनी द्विपक्षीय आर्थिक सहकार्यावर उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांच्यासोबतच्या बैठकीत यासंबंधी घोषणा केली आहे. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत आण्विक ऊर्जा, औषधे, वैद्यकीय उपकरणांवरून करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
कुडनकुलम आण्विक ऊर्जा प्रकल्पाच्या (एनपीपी) भविष्यातील युनिट्सशी गिडित काही अत्यंत महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केल्याचे जयशंकर यांनी रशियातील भारतीयांना संबोधित करताना म्हटले आहे. कुडनकुलम आण्विक ऊर्जा प्रकल्प रशियाच्या तांत्रिक सहकार्याद्वारे तामिळनाडूत स्थापन करण्यात येत आहे. याची निर्मिती मार्च 2002 मध्ये सुरू झाली होती. फेब्रुवारी 2016 पासून कुडनकुलम एनपीपीचे पहिले वीज युनिट 1 हजार मेगावॅटच्या क्षमतेसह सातत्याने काम करत आहे.
हा प्रकल्प 2027 मध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. रशिया हा संरक्षण, आण्विक ऊर्जा, अंतराळ यासारख्या काही क्षेत्रांमध्ये विशेष भागीदार आहे. परस्परांमध्ये उच्चस्तरीय विश्वास असेल तरच या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य केले जाऊ शकते. भारत आणि युरेशियन आर्थिक क्षेत्रादरम्यान मुक्त व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी जानेवारीच्या अखेरपर्यंत दोन्ही देशांचे शिष्टमंडळ एकत्र येणार आहे. पेमेंट समस्येवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. जयशंकर यांनी रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याशी द्विपक्षीय, बहुपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
द्विपक्षीय संबंध असाधारण
भारत आणि रशियाचे संबंध असाधारण आहेत. जागतिक राजकारणात केवळ भारत-रशिया संबंधच स्थिर राहिले आहेत. मागील 70-80 वर्षांमध्ये भारत आणि रशिया दोन्ही देशांमध्ये बरेच काही बदलले आहे. जागतिक राजकारण देखील मोठ्या प्रमाणात बदलले आहे तरीही नवी दिल्ली आणि मॉस्को यांच्यातील संबंध स्थिर राहिले आहेत असे म्हणत जयशंकर यांनी भारतीय समुदायाला दोन्ही देशांमधील सहकार्य वृद्धींगत करण्यात योगदान देण्याचे आवाहन केले आहे.