For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऐन दिवाळी हंगामात कुडाळ-पुणे बस रद्द ; प्रवासी वाऱ्यावर

03:05 PM Nov 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
ऐन दिवाळी हंगामात कुडाळ पुणे बस रद्द   प्रवासी वाऱ्यावर
Advertisement

कंडक्टर नसल्याने रोजची फेरी रद्द करायची वेळ ; कुडाळ आगाराचा भोंगळ कारभार

Advertisement

वेंगुर्ला आगारातुन शिवशाही ऐवजी लालपरी

कुडाळ / प्रतिनिधी

Advertisement

कुडाळ आगाराच्या नियोजनशून्य आणि भोंगळ कारभाराचा फटका आज पुणे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. कंडक्टर नसल्याने रविवारी सकाळी 6.45 वाजता सुटणारी कुडाळ-पुणे फेरी रद्द करण्यात आली. आरक्षण करूनसुद्धा ऐन हंगामातील रोजची फेरी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. प्रवाशांनी कुडाळ एसटी आगारच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. कुडाळ आगाराचे खासगी बस चालकांशी संधान असल्याने पुणे बस नेहमीच रद्द केली जाते असासंशय काही प्रवाशांनी यावेळी व्यक्त केला. कुडाळ-पुणे बस सकाळी 6.45 वाजता कुडाळ वरून सुटते. त्यामुळे अगदी 6.15 वाजल्यापासूनच प्रवासी कुडाळ बसस्थानकात येऊन थांबले होते. पण बसचा वेळ होऊन देखील बस फलाटाला लागली नसल्याने प्रवाशात चलबिचल सुरू झाली. अखेर काही प्रवाशांनी वाहतूक नियंत्रक कक्ष गाठत चौकशी केली असता वाहतूक नियंत्रकानी ड्रायव्हर आहे पण कंडक्टर उपलब्ध नसल्याने कुडाळ-पुणे फेरी रद्द केली असल्याचे सांगितले.एकतर ही कुडाळ आगाराची रोजच्या वेळापत्रकातील फेरी. दिवाळीच्या सुट्टीचा हंगाम असल्याने बऱ्याच प्रवाशांनी ओरोस, कणकवली येथून तिकीट आरक्षित केले होते. त्यामुळे खात्रीपूर्वक प्रवासाची हमी त्या प्रवाशांना होती. पण ऐन वेळी कुडाळ आगाराने आपल्या भोंगळ आणि नियोजनशून्य कारभाराचा प्रत्यय आणून दिला. कुडाळ आगाराची लांब तसेच स्थानिक भागातील बस सेवा नेहमीच रामभरोसे झाली आहे. आगार व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे नेहमीच दिसून येते. त्यानंतर सारे प्रवासी 8 वाजता येणाऱ्या पणजी पुणे गाडीची वाट बघत थांबले. पण ती गाडी सुद्धा 9.30 नंतर आली. त्या गाडीत तर आत शिरायला पण जागा नव्हती एवढी गर्दी. तरी देखील काही प्रवाशी त्या गाडीतून गेले. काही कोल्हापूरला जाणारे प्रवासी नंतर आलेल्या वेंगुर्ला कोल्हापूर बसने गेले.

वेंगुर्लेतून शिवशाही ऐवजी लालपरी !

तरीसुद्धा पुण्याला जाणारे बरेच प्रवासी बसच्या प्रतिक्षेत होतेच. वाहतूक नियंत्रकानी त्यांना 8.30 वाजता वेंगुर्ला -पुणे शिवशाही बस आहे असे सांगितले होते. पण ती बस सुद्धा 10.10 वाजता आली. पण शिवशाही ब्रेकडाऊन आल्याने साधी लालपरी वेंगुर्ले आगराने पाठवली होती. त्यात सुद्धा सगळ्या सीट आरक्षित. पण कसे तरी करुन पुण्याचे प्रवासी त्या गाडीतुन पुढे मार्गस्थ झाले.कुडाळ आगाराच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे हल्ली पुढे येत आहेत. दरवेळी मनुष्यबळ कमीचे कारण सांगितले जाते. पण यांची कल्पना जेव्हा प्रवाशी तिकीट आरक्षित करतो तेव्हा नसते का? काही प्रवाशांनी तर ऑनलाइन नाही तर, बस स्थानकात जाऊन तिकिट खिडकीवर आरक्षण केलेले असते. स्टाफ कमी तर मग त्यांना कसे आरक्षण दिले जाते? त्यांना स्टाफ कमतरतेची कल्पना का नाही दिली जात? दरवेळी ही पुणे गाडीच का रद्द केली जाते? की यांचे खासगी बसवाल्यांशी कनेक्शन आहे? असे सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद फक्त मिरवायला आहे की तसे वागण्याचा प्रयत्न कुडाळ आगार खरंच करणार का, हाच खरा प्रश्न आहे.

Advertisement
Tags :

.