अपहरण व बेदम मारहाण प्रकरणातील दोन वर्षांपासून फरार आरोपी पुण्यात जेरबंद; सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई
चार लाख रुपयांच्या मागणीवरून मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कृष्णा संजय माळी (रा. कुडाळ) यांना कुडाळ एमआयडीसी परिसरातून बलेनो कारमध्ये जबरदस्तीने बसवून गोव्यातील पत्रादेवी येथील हॉटेल व्हिवा गोवा येथे नेण्यात आले. त्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांना तेर्सेबांबर्डे येथील हॉटेल साई प्रसाद येथे आणण्यात आले.
या काळात चार लाख रुपये कधी देणार, अशी विचारणा करत विलास वसेकर याच्यासह पाच ते दहा जणांनी माळी यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 24 ऑक्टोबर 2024 रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीच्या आधारे शोध
गुन्हा दाखल झाल्यापासून विलास वसेकर स्वतःची ओळख लपवून राहत असल्याने कुडाळ पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, तो पुण्यातील मोशी येथील कचरा डेपो परिसरात अँथनी लारा रिन्यूएबल एनर्जी कंपनीत काम करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे तसेच त्याच्या मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक विश्लेषणातून त्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अन्य गुन्हेही दाखल
विलास वसेकर याच्याविरुद्ध सोलापूर ग्रामीणमधील बार्शी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 304-ब आणि 354-अ यांसह विविध कलमांनुसार तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, सदानंद राणे, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि प्रथमेश कदम यांचा समावेश होता.
वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला कुडाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन अवताडे करीत आहेत.
