For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कुडाळमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी; वडापावच्या दुकानावर झाड कोसळले

08:42 PM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
कुडाळमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी  वडापावच्या दुकानावर झाड कोसळले
Advertisement
कुडाळ : कुडाळ शहरासह तालुक्यातील काही भागांत शुक्रवारी सायंकाळी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान पिंगुळी येथील एमआयडीसी फाट्याजवळ सुरूचे मोठे झाड कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्यालगत असलेल्या शिव वडापाव दुकानावर कोसळले. या घटनेत दुकानदार राजन पुरळकर आणि दुकानात उपस्थित असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुदैवाने बचावल्या. मात्र, दुकानाचे आणि वीज वितरण यंत्रणेचे नुकसान झाले.

शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह सुमारे तासभर पाऊस सुरू होता. यावेळी जोरदार वारेही वाहत होते. अचानक आलेल्या पावसामुळे भातकापणीच्या कामात गुंतलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

Advertisement

झाड वीजखांबावर अडकल्याने अनर्थ टळला

पिंगुळी-म्हापसेकर तिठ्यापासून काही अंतरावर असलेल्या एमआयडीसी फाट्याजवळ सुरूचे झाड उन्मळून पडले. हे झाड वीजखांबावर अडकल्याने त्याच्या फांद्या शिव वडापाव दुकानावर पडल्या. त्यावेळी दुकानात राजन पुरळकर यांच्यासह काही महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या. झाड कोसळल्याचा आवाज होताच सर्वजण घाबरले; मात्र त्यांनी तातडीने दुकानाबाहेर धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेत दुकानाचे नुकसान झाले असून वीजखांब आणि वीज वितरण यंत्रणेतील काही साहित्याचेही नुकसान झाल्याची माहिती आहे.

Advertisement

ग्रामस्थांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत

झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे कुडाळ-वेंगुर्ले मुख्य मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण यांनी जेसीबी आणून स्वतःच्या देखरेखीखाली झाड बाजूला करण्याचे काम केले. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

या मदतकार्यात पिंगुळी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक गावडे, बाबल गावडे, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पोलीस पाटील सतीश माडये, शंकर साताडेकर, विपुल प्रभू, केदार रासम, रोहन परब, शायर खान तसेच पोलीस कर्मचारी श्याम भगत, प्रकाश गावडे आणि संतोष गावडे यांनी सहभाग घेतला.

परतीच्या पावसामुळे वातावरणात गारवा

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भातशेतीचे नुकसान झाले असून आगामी काळात पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक परतीच्या पावसाची प्रतीक्षा करत असताना शुक्रवारी झालेल्या पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. मात्र, वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून नुकसान झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Advertisement
Tags :

.