For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कारने पाठलाग करून अडविले; मारहाण करत जीवे मारण्याची धमकी, कुडाळमध्ये गुन्हा दाखल

10:17 PM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
कारने पाठलाग करून अडविले  मारहाण करत जीवे मारण्याची धमकी  कुडाळमध्ये गुन्हा दाखल
Advertisement
कुडाळ : दारू व्यवसायाच्या आड येत असल्याचा आरोप करत कारने पाठलाग करून एका व्यक्तीची गाडी अडवून त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना कुडाळ येथे घडली. याप्रकरणी संतोष पांडुरंग देऊलकर (रा. बिबवणे) याच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेय रावजी गावडे (रा. माड्याचीवाडी) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी दुपारी अमेय गावडे हे पत्नी अंकिता यांच्यासोबत आपल्या कारमधून कुडाळ बाजारपेठेतून माड्याचीवाडी येथील घरी जात होते. कुडाळ-वेंगुर्ले मुख्य रस्त्यावर गवळदेव परिसरात, हॉटेल अभिमन्यूसमोर त्यांच्या कारच्या मागून मोठमोठ्याने हॉर्न वाजवत संतोष देऊलकर हा बलेनो कार घेऊन आला. त्याने गावडे यांच्या कारसमोर आपली गाडी आडवी घालून त्यांना अडविले.

Advertisement

त्यानंतर देऊलकर कारमधून खाली उतरला आणि गावडे यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करू लागला. ‘तू माझ्या दारू धंद्याच्या आडवा येतोस काय? तुला मस्ती आली आहे, आज तुझी मस्ती उतरवितो,’ असे म्हणत त्याने गावडे यांना धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच, ‘आज तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत त्याने गावडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

पतीला सोडविण्यासाठी पुढे आलेल्या अंकिता गावडे यांनाही संशयिताने धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेदरम्यान संशयित मोठमोठ्याने ओरडून गावडे यांना जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे घटनास्थळी नागरिक आणि ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची गर्दी झाली होती.

Advertisement

या प्रकरणी अमेय गावडे यांच्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी संतोष देऊलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.