वडिलांनी दुचाकी घेऊन न दिल्याच्या रागातून १५ वर्षीय मुलाची आत्महत्या; कुडाळमधील धक्कादायक घटना
युवराजचे कुटुंबीय कामानिमित्त कुडाळ येथे वास्तव्यास असून ते मेहनील प्लाझा येथील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. युवराज शिक्षणासाठी निरुखे येथील मामाकडे राहत होता. तो पांग्रड हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. अधूनमधून तो कुडाळ येथे आपल्या घरी येत असे.
युवराजने वडिलांकडे एफझेड दुचाकी घेऊन देण्याची मागणी केली होती. मात्र, वडिलांनी त्यास नकार दिल्याने तो नाराज असल्याचे समजते. गुरुवारी रात्री कुडाळ येथील राहत्या फ्लॅटमधील बेडरूममध्ये तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ही घटना गुरुवारी रात्री १०.३० ते ११.३० या वेळेत घडल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी वडील विजय विद्याधर परब यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
कुडाळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गुरुदास पाडावे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव व संदीप वराडकर यांनी पंचनामा केला. शुक्रवारी सकाळी कुडाळ येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी शिरवल येथे नेण्यात आला.
युवराजच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेने कुडाळ, निरुखे आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
