राज्य नाट्यस्पर्धेत सावंतवाडीच्या ‘क्षितिज इव्हेंट’चा डंका; ‘संगीत वीज म्हणाली धरतीला’ नाटकाला पाच वैयक्तिक पुरस्कार
महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या या मानाच्या स्पर्धेत क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी निर्मित ‘संगीत वीज म्हणाली धरतीला’ या नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञांनी आपल्या अभिनय व तांत्रिक कौशल्याच्या जोरावर परीक्षकांची आणि रसिकांची मने जिंकली.
या नाटकासाठी आज्ञा कोयंडे यांना अभिनयाचे रौप्य पदक मिळाले. दत्तात्रय (बाळ) पुराणिक यांना नेपथ्यासाठी द्वितीय पारितोषिक, वैभवी पुराणिक यांना वेशभूषेसाठी द्वितीय पारितोषिक, अभिषेक कोयंडे यांना प्रकाशयोजनेसाठी तृतीय पारितोषिक, तर संजय जोशी यांना उत्कृष्ट रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
जानेवारी 2026 मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेचा ‘नाट्यगौरव’ राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा सोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात दिमाखात संपन्न झाला. राज्याचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या कलाकार व तंत्रज्ञांना गौरविण्यात आले.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पुढील वर्षापासून संगीत एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. सोहळ्यास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्यासह नाट्य क्षेत्रातील दिग्गज, नामवंत कलाकार आणि रंगकर्मी उपस्थित होते.
क्षितिज इव्हेंटच्या या यशामुळे सावंतवाडीच्या नाट्यचळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून, कलाकार आणि तंत्रज्ञांचे राज्यभरातून तसेच कोकणातून अभिनंदन होत आहे.
