क्षेत्रज्ञाने प्रकृती आणि पुरुषाच्या माध्यमातून सृष्टीनिर्मिती केलेली आहे
अध्याय नववा
क्षेत्रज्ञाची वैशिष्ट्यो सांगायची म्हंटली तर अनादि, इंद्रियरहित गुण भोगणारे पण गुणांनी विरहित, अव्यक्त, सत् व असत या दोहोहूनहि वेगळे, इंद्रिये व त्यांचे विषय प्रकाशित करणारे, विश्वाचे पालन करणारे, सर्वव्यापी, एक असून नाना प्रकारांनी भासमान होणारे, अंतरबाह्य पूर्ण असलेले, संगरहित, अंध:काराच्या पलीकडे असलेले, अति सूक्ष्मत्वामुळे जाणण्याला कठीण, प्रकाशमान वस्तूंना देखील प्रकाशित करणारे, ज्ञानानेच समजणारे अशी सांगता येतील. त्याला समजून घेऊन त्याची अनुभूती घ्यायची असेल तर तो सूक्ष्म असल्याने त्याचे सूक्ष्म रूप म्हणजे नाम ते सतत घ्यावे आणि ते घेत असताना त्याचे जड म्हणजे सगुण रूप सतत आठवावे, असे सर्व संत स्वानुभवातून सांगतात. त्यासाठी त्याचे सतत नाम घ्यावे. ते घेण्याचा मुख्य उद्देश असा की, मनुष्य जसजसा नामस्मरणात रंगून जातो तसतसे ईश्वराचे सगुण रूप त्याच्या डोळ्यासमोर ठाण मांडून उभे राहते आणि त्याला त्याचा ध्यास लागतो. ईश्वर त्याच्या चित्तात साठवला जातो.
ज्याप्रमाणे मालक घरात आला की, चोर पळून जातात त्याप्रमाणे ईश्वर चिंतनाने चित्त भरून गेलं की, मनातील इतर विचार पळून जातात. नाम हे ईश्वराचे सूक्ष्म रूप आहे आणि सगुण रूप हे जड रूप आहे. संतांची योजना अशी आहे की, रूपाचे ध्यान करत करत नाम घेत राहिले असता आपोआपच सूक्ष्मातिसूक्ष्म असलेला परमात्मा प्राप्त होईल आणि अशी ईश्वरप्राप्ती झाली की, बाप्पांनी सांगितलेल्या क्षेत्रज्ञाची प्रचिती येईल. म्हणून भक्ताने सगुणाची आराधना वाढवावी म्हणजे बाकीच्या उपाधी म्हणजे बाह्य गोष्टींच्या आवडीनिवडी आपोआप कमी होत जातील.
श्री संत अमृतरायही त्यांच्या खालील अभंगातून, सगुणाची भक्ती करून त्यांना आलेल्या ब्रह्माच्या अनुभूतीचे वर्णन करत आहेत ते म्हणतात, अजि मी ब्रह्म पाहिले ।अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी । कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले। एकनाथाच्या भक्तिसाठी ।धावत आला तो जगजेठी ।खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले। चोख्यासंगे ढोरे ओढिता ।शिणला नाही तो तत्त्वता । जनीसंगे दळिता कांडिता । गाणे गाईले। दामाजीची रसिद पटवली ।कान्होपात्रा ती उद्धरिली ।अमृतराय ह्मणे ऐसी माउली ।संकटा वारिले।
अशा या सर्वगुणसंपन्न क्षेत्रज्ञाने प्रकृती आणि पुरुषाच्या माध्यमातून सृष्टीनिर्मिती केलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात श्रीगणेशगीतेच्या पुढील श्लोकातून,
एतदेव परं ब्रह्म ज्ञेयमात्मा परोऽव्यय
गुणान्प्रकृतिजान्भुत्ते पुरुषऽ प्रकृतेऽ परऽ ।। 30 ।।
अर्थ- अत्यंत श्रेष्ठ, ज्ञेय व नाशरहित प्रकृतीहून वेगळा असलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या गुणांचा भोग घेतो.
विवरण- बाप्पा म्हणतात, परब्रह्म स्वत: अव्यय आहे, परिपूर्ण असून त्याच्यात कोणतीही न्यूनता नाही. त्याच्यातील काही कमी होत नाही किंवा त्याच्यात कोणतीही भर पडत नाही. पुढं बाप्पा सांगतात, ज्याची सुरुवात कुठून होते ते माहीत नसले की, ती गोष्ट अनादि ठरते. परब्रह्म अनादि आहे त्याप्रमाणे प्रकृती आणि परमात्म्याचा अंश असलेला पुरुष, जीवात्मा हे दोघेही अनादि आहेत. प्रकृती सत्व, रज आणि तम ह्या गुणांनी युक्त असते तर पुरुष संपूर्णपणे गुणरहीत असून निर्विकार आहे. प्रकृती जड आणि पुरुष चैतन्यपूर्ण आहे. तो प्रकृतीला व्यापून राहतो आणि प्रकृती त्याची महाशक्ती होय. तिच्या स्वभावाला अनुसरून पुरुष जीवदशेला येतो. म्हणून सर्वसामान्य माणसाचा मी कर्ता आहे असा समज होतो आणि त्यानुसार त्याच्या हालचाली सुरु असतात.
क्रमश: