केएसडीएल करणार विजापूरमध्ये 250 कोटींची गुंतवणूक
200 जणांना रोजगार शक्य : सिंगल विंडो समितीच्या बैठकीत 3,500 कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यस्तरीय सिंगल विंडो मंजुरी समितीने शनिवारी विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी एकूण 3,500.86 कोटी रुपये भांडवल गुंतवणुकीच्या 69 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये कर्नाटक सोप्स अॅण्ड डिटर्जंट्स लिमिटेड (केएसडीएल) च्या गुंतवणुकीचाही समावेश आहे. ही कंपनी विजापूर जिल्ह्यातील इट्टंगीहाळ येथे आपले युनिट सुरू करणार असून 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिंगल विंडो समितीच्या 152 व्या बैठकीत राज्यात एकूण 3,500.86 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 69 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे 24,954 जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. गोकूल मेटाटेक प्रा. लि. कंपनी बेळगावमधील वाघवडे येथे 96 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या उत्पादन युनिटमुळे 324 जणांना रोजगार उपलब्ध होतील.
बेळगाव, विजापूरसह रामनगर, कोलार, तुमकूर, चिक्कबळ्ळापूर, बेंगळूर ग्रामीण आणि चिक्कमंगळूर जिल्ह्यांमध्ये विविध कंपन्या आपल्या शाखा उघडणार आहेत. नव्याने अस्तित्वात येणाऱ्या उद्योगांमध्ये मशीन टूल्स, शितपेय, कार इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर, लोखंड आणि पोलाद, शुद्ध हायड्रोजन वायू, दूध पावडर उत्पादन युनिट्स यांचा समावेश आहे.
12 कंपन्या 100 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार
100 कोटी रुपयांपेक्षा अधिक भांडवल गुंतवणुकीच्या 12 प्रमुख अवजड आणि मध्यम उद्योगांना मंजुरी देण्यात आली आहे. यातून 2,311.88 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे 18,972 जणांना रोजगाराच्या संधी मिळतील. 15 ते 50 कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीच्या 55 नव्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. यातून 1,148.98 कोटी रु. भांडवल गुंतवणूक होणार असून अंदाजे 5,832 जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
दोन अतिरिक्त गुंतवणुकीच्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे 40 कोटींची गुंतवणूक होणार असून 150 जणांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे.
कोका कोला कंपनी बिडदीमध्ये उत्पादन युनिट सुरू करणार
ज्योती सीएनसी कंपनी तुमकूर जिल्ह्यातील वसंतनरसापूर येथे 285 कोटींची गुंतवणूक करून उत्पादन युनिट सुरु करणार आहे. यातून 3,394 जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटक सोप्स अॅण्ड डिटर्जंट्स लि. कंपनी विजापूर जिल्ह्याच्या इट्टंगीहाळ येथे 250 कोटी रु. गुंतवणूक करणार आहे. यामुळे 200 जणांना रोजगार उपलब्ध होईल. हिंदुस्तान कोका कोला ब्रेव्हरेजेस प्रा. लि. रामनगर जिल्ह्याच्या बिडदी औद्योगिक वसाहतीत युनिट सुरू करणार असून 249 कोटी रु. गुंतवणूक करणार आहे.
शिंडेझेन इंडिया प्रा. लि. कोलार जिल्ह्यातील वेमगल औद्योगिक वसाहतीत 238 कोटींची गुंतवणूक करेल. यातून 1,030 जणांना रोजगार मिळणार आहे. एसएसके ऑटोमोबाईल्स प्रा. लि. कंपनी कोलार जिल्ह्याच्या बसवनहळ्ळी औद्योगिक वसाहतीत 183 कोटी रु. गुंतविणार असून 760 जणांना रोजगाराच्या संधी अपेक्षित आहे. अलाईड मोल्डेड एन्क्लोजर प्रॉडक्ट्स इंडिया प्रा. लि. रामनगर जिल्ह्याच्या हारोहळ्ळी येथे 135 कोटी रु. गुंतविणार असून 126 जणांना रोजगार देणार आहे.
बैठकीला वाणिज्य आणि उद्योग खात्याचे मुख्य सचिव डॉ. सेल्वकुमार, औद्योगिक विकास आयुक्त गुंजन कृष्णा, कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी सदस्य डॉ. एन. महेश, आयटीबीटी खात्याचे संचालक राहुल एस. संकनूर, कर्नाटक उद्योग मित्रचे व्यवस्थापकीय संचालक दो•बसवराजू आणि विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.