दापोली नगराध्यक्षपदी कृपा घाग निश्चित
दापोली :
दापोली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेनेच्या कृपा घाग यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे दाखल झाले. छाननीत ते वैध असल्याचे सिद्ध झाल्याने घाग यांचा बिनविरोध नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. 28 मे रोजी त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
दापोलीच्या तत्कालीन नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर सर्व नगरसेवकांनी अविश्वास ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. हा ठराव 16 विरुद्ध 1 मतांनी पारित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र या प्रक्रियेच्या विरोधात माजी नगराध्यक्षा मोरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. अशातच जिल्हा प्रशासनाने नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली. दरम्यान, गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत असताना या निवडणुकीसाठी घाग यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यानंतर अर्जाची छाननी होऊन अर्ज वैध ठरला. त्यामुळे 28 रोजी घाग यांची नगराध्यक्षपदासाठी अधिकृत घोषणा केवळ औपचारिकताच राहिली आहे.
..