For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृति सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवरून वाद; GIVA ने जाहिरात घेतली मागे, नेमका आक्षेप काय?

04:11 PM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
कृति सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवरून वाद  giva ने जाहिरात घेतली मागे  नेमका आक्षेप काय
Advertisement

नवी दिल्ली : अभिनेत्री कृति सेनन झळकलेल्या दागिन्यांच्या ब्रँड GIVAच्या रक्षाबंधन विशेष जाहिरातीवरून वाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने ही जाहिरात मागे घेतली आहे. जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्याचे सांगत कंपनीने सर्व माध्यमांतून ती हटवली.

Advertisement

GIVA ने सोशल मीडियावर निवेदन प्रसिद्ध करत भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांविषयी कंपनीला पूर्ण आदर असल्याचे स्पष्ट केले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रेमाचा उत्सव पाळीव प्राण्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही जाहिरात तयार करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले.

जाहिरात नेमकी काय होती?

जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये कृति सेनन आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी बसलेली दिसते. त्याचवेळी तिच्या शेजारी बसलेला कुत्रा भुंकू लागतो. त्यानंतर कृति त्या कुत्र्यालाही राखी बांधताना दाखवण्यात आली आहे.

Advertisement

या दृश्यावरून सोशल मीडियावर काही लोकांनी आक्षेप घेत जाहिरात हिंदू संस्कृती आणि रक्षाबंधनाच्या परंपरेशी सुसंगत नसल्याचे म्हटले.

कपडे आणि पारंपरिक विधी नसल्यावरही आक्षेप

जाहिरातीतील कृति सेननच्या वेशभूषेवरही काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले. रक्षाबंधनासारख्या पारंपरिक सणाच्या जाहिरातीत आरतीची थाळी, भावाच्या कपाळावरील तिलक यांसारखे पारंपरिक विधी दाखवण्यात आले नसल्याचेही आक्षेप घेण्यात आले.

याशिवाय रक्षाबंधनातील राखी हा पवित्र बंध मानला जातो. त्यामुळे ती कुत्र्याला बांधण्याचे दृश्य योग्य नसल्याचे काहींनी म्हटले.

GIVA ने काय म्हटले?

वाद वाढल्यानंतर GIVA ने जाहिरात मागे घेतली. कंपनीने म्हटले की, जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून तसा कंपनीचा उद्देश नव्हता. त्यामुळे जाहिरात सर्व माध्यमांतून सन्मानपूर्वक हटवण्यात आली आहे.

कंपनीने भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचा आदर करत असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, जाहिरात मागे घेण्याच्या निवेदनाच्या शेवटी कंपनीने टीका करणाऱ्यांना ‘सकारात्मक राहण्याचा’ संदेश देत अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू आहे.

जाहिरात मागे घेतल्यानंतरही या प्रकरणावर सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, सण आणि जाहिरातींमधील सांस्कृतिक संवेदनशीलतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Tags :

.