For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृष्णा नदीची पाणीपातळी घटली; ‘कोयनेतून तातडीने पाणी सोडा’ : भाजप नेते शरद लाड

01:03 PM Sep 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
कृष्णा नदीची पाणीपातळी घटली  ‘कोयनेतून तातडीने पाणी सोडा’   भाजप नेते शरद लाड
Advertisement

कुंडल (वार्ताहर) : कृष्णा नदीतील पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याने सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील नदीकाठच्या शेतीसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोयना धरणातून कृष्णा नदीत तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी भाजप नेते तथा क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हा प्रशासनाकडेही मागणी केली आहे.

Advertisement

कृष्णा नदीच्या घटत्या पाणीपातळीचा परिणाम ताकारी, टेंभू, म्हैसाळ यांसह विविध उपसा सिंचन योजनांवर होण्याची शक्यता आहे. नदीवर अवलंबून असलेल्या भागातील ऊस आणि अन्य पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असताना नदीतील पाणी कमी होत असल्याने चिंता वाढली आहे.

उपसा सिंचन योजनांना अडथळ्याची शक्यता

कृष्णा नदीतून पाणी उचलून दुष्काळी भागातील शेतीपर्यंत पोहोचविणाऱ्या उपसा सिंचन योजनांसाठी नदीतील पाणीपातळी महत्त्वाची आहे. पाणीपातळी आणखी खालावल्यास उपसा केंद्रांवर पाणी उचलताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊन योजनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Advertisement

या योजनांवर अवलंबून असलेल्या भागातील ऊस व अन्य पिकांच्या सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता असून, काही पाणीपुरवठा योजनाही कृष्णा नदीवर अवलंबून आहेत. त्यामुळे नदीतील पाणीपातळी कमी झाल्यास पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवरही परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

गणेश विसर्जनाचाही प्रश्न

कृष्णा नदीतील घटलेल्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या गावांमध्ये गणेश विसर्जनाबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नदीपात्रात पुरेसे पाणी उपलब्ध राहील का, याबाबत गणेश मंडळांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शरद लाड यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कृष्णा नदीतील सद्यस्थितीची माहिती घेतली. कोयना धरणातून पाणी सोडल्यास नदीकाठची शेती, उपसा सिंचन योजनांच्या कार्यक्षेत्रातील पिके तसेच दुष्काळी भागातील पाणीपुरवठ्याला दिलासा मिळू शकतो. त्यामुळे परिस्थितीचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement
Tags :

.