Kolhapur Breaking : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत कृष्णराज महाडिकांची माघार
इच्छुकांना संधी मिळावी म्हणून महाडिकांचा निर्णय
कोल्हापूर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक हे चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी महापालिका निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता, महाडिकांची तिसरी पिढी देखील राजकारणात उतरत आहे, यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले होते , अशातच आता महत्वाची बातमी समोर येत आहे, कृष्णराज महाडिक यांनी महानगरपालिका निवडणुकीमधून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.. ..
काय म्हणाले कृष्णराज महाडिक
भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून, या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात. त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर राखत, मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही, असं युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे
पत्रकात पुढे म्हणले आहे की , महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. अशावेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी आणि कोणालाही निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, या विचारातून मी महापालिका निवडणूक लढवणार नाही.
वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, मी निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते. आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही. तथापि या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला, ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे.
यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे.