Satara News : 'कृष्णा'च्या निवडणुकीतून सहा उमेदवारांची माघार
06:04 PM Jun 09, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
आज अंतिम मुदत; राजकीय हालचालींना वेग
Advertisement
कराड: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक - निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेला वेग आला असून, सोमवारी विविध मतदारसंघांतील सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मंगळवारी ९ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी अधिकच गतिमान झाल्या आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यक्तिगतरित्या ऊस उत्पादक गट क्रमांक १ (वडगाव हवेली-दुशेरे) मधून बाळासो आकराम जगताप आणि आप्पासाहेब ज्ञानदेव जगताप यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच गट क्रमांक २ (काले कार्वे) मधून शरदराव गुणवंतराव पाटील व शशिकांत अशोक जायच यांनी निवडणुकीतून माघार घेतली. याशिवाय गट क्रमांक ५ (येडेमच्छिंद्र-वांगी) मधून प्रतापसिंह आनंदराव जाधव यांनीही आपला अर्ज मागे घेतला.
इतर मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघातून संजय बाबुराव शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतल्याने संबंधित मतदारसंघातील समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडली. या घडामोडींमुळे अनेक मतदारसंघांतील स्पर्धेचे स्वरूप बदलले असून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीतील खरे चित्र समोर येणार आहे.
दरम्यान, अर्ज माघारीच्या अंतिम दिवसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणखी काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील अंतिम लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सभासदांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रचाराचा धुरळा उडण्याची चिन्हे दिसत आहेत.
Advertisement