For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृष्णजन्मभूमीचे होणार सर्वेक्षण; ‘सर्वोच्च न्यायालया’कडूनही अनुमती

06:49 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
कृष्णजन्मभूमीचे होणार सर्वेक्षण  ‘सर्वोच्च न्यायालया’कडूनही अनुमती
Advertisement

मुस्लीम पक्षाची आव्हान याचिका फेटाळली

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

हिंदूंचे मथुरेतील पवित्र तीर्थस्थान असणाऱ्या कृष्णजन्मभूमीचे आणि तिच्या नजीक असणाऱ्या इदगाह परिसराचे सर्वेक्षण केले जावे, हा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय गुरुवारी दिला होता. तो मान्य न झाल्याने मुस्लीम बाजूकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती.

Advertisement

कृष्णजन्मभूमीच्या नजीक असणारा शाही इदगाह परिसर इतिहासकाळात कृष्णजन्मभूमीचाच भाग होता. कृष्णजन्माचे खरे स्थान या इदगाह परिसरात भूमीच्या उदरात आहे. मुस्लीम सत्तेच्या काळात हे मंदिर पाडविण्यात आले. मात्र, त्याचा पाया आजही या भागात भूमीच्या खाली आहे. त्यामुळे या परिसराचे सर्वेक्षण केले जाणे आवश्यक आहे, असे हिंदू पक्षकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात तशी मागणी करणारी याचिका सादर केली होती. ही मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात धाव

मुस्लीम बाजूने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका शुक्रवारी त्वरित सुनावणीला आली. न्यायालयाने अशा सर्वेक्षणाची आवश्यकता आहे, असे निरीक्षण नोंदवत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरविल्याने आता सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दोन-तीन आठवड्यांमध्ये या सर्वेक्षणाच्या प्रारंभाची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.