For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मज्ञानाचे दर्शन कृष्णाने वर्तणुकीतून घडवले

06:48 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आत्मज्ञानाचे दर्शन कृष्णाने वर्तणुकीतून घडवले
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

शुकमुनी परीक्षित राजाला श्रीकृष्णमहात्म्य सांगत होते. ते म्हणाले, श्रीकृष्णांनी ह्या अवतारात सगळ्यापासून अलिप्त राहून, समाधानाने वागून दाखवले. स्वत: जरी आत्मज्ञानी असले तरी कोणतेही काम करायला त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. गोकुळात असताना गायींची सेवा करावी लागते म्हणून त्यांना कधी दु:ख झाले नाही. स्वत: द्वारकाधीश असून त्यांनी अनेकांची सेवा केली. राजसूय यज्ञात पाहुण्यांची उष्टीखरकटी काढण्याचे काम त्यांनी आनंदाने पत्करले होते.

महाभारतीय युद्धात त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता अर्जुनाचे सारथ्य करायचे कबूल केले. सारथी म्हणून अर्जुनाच्या रथाची घोडी धुताना त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. आपल्या सद्गुरूंचा मेलेला पुत्र परत आणताना किंवा आपल्याच कुळाचे निर्दालन करताना त्यांच्या आत्मज्ञानात कधीही उणीव आली नाही. आपले ब्रीद जपण्यासाठी कुणाचा कैवार घेतला तर कुणाशी कट्टर वैर घेतले पण असं जरी असलं तरी ही सगळी आपलीच लेकरे आहेत ह्या गोष्टीचा त्यांना कधीच विसर न पडल्याने सगळ्यांशी असलेली त्यांची एकात्मता अणुभरही ढळली नाही.

Advertisement

जो कुणी शरण आला त्याचा उद्धार तर केलाच पण सगुण अवतारात असल्याने आपल्यापेक्षा वयाने श्रेष्ठ असलेल्यांच्या चरणी माथा ठेवण्यात त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. मनुष्य थोडेसे शिकलेला असला तरी स्वत:च्या शिक्षणाचा, ज्ञानाचा तो तोरा मिरवत असतो. त्याबद्दल सतत बोलून दाखवत असतो. मी तुमच्यापेक्षा सरस आहे हे त्याच्यापेक्षा कमी शिकलेल्यांना सारखे सुनावत असतो.

थोडक्यात आपण कोणीतरी महान आहोत ह्याबद्दल त्याला अहंकार वाटत असल्याने त्याच्या मोठेपणाची, जाणीव तो इतरांना सारखी करून देत असतो पण श्रीकृष्णनाथांचे तसे नव्हते. आपल्या महानतेचे, आत्मज्ञानी असल्याचे त्यांनी कधी कुठे बोलून दाखवल्याचा दाखला मिळत नाही.

आत्मप्रौढी कुठेच न मिरवता त्यांच्यातल्या आत्मज्ञानी व्यक्तीचे त्यांच्या वर्तणुकीतून त्यांनी दर्शन घडवले. साधू होऊन साधुस ओळखावे ह्या उक्तीप्रमाणे जे स्वत: आत्मज्ञानी होते त्यांनी त्यांना बरोबर ओळखले होते.

इतर मात्र त्यांना आपल्याप्रमाणे एक सामान्य मनुष्य समजत. त्यांची रणछोडदास, गवळ्याचा पोर म्हणून हेटाळणी करत पण सर्वांच्याबद्दल आत्मीयता वाटत असल्याने त्यांनी कधी त्यांचा दुस्वास केला नाही. ही जी आत्मज्ञानी व्यक्तीची अतिगुह्य लक्षणे आहेत ती त्यांच्या वागण्याबोलण्यातून नेहमीच व्यक्त होत असत.

इतरांशी आपण त्यांच्यापैकीच एक आहोत अशा पद्धतीने वागताना त्यांना त्यांच्या आत्मज्ञानी असण्याचा कधीच विसर न पडल्याने त्यांना इतरांच्या वागण्याचा त्रास होऊन त्यांचे विकार बळावलेत किंवा विकारांनी त्यांचा ताबा घेतल्यामुळे त्यांच्या हातून गैरवर्तणूक झाली असा प्रसंग कधी घडला नाही.

संपूर्ण निरिच्छ स्वभाव असल्याने ते कायम शांतीरूप होऊन राहिले. अशी त्यांच्या देहाची ख्याती असल्याने त्यांच्या केवळ दर्शनाने दिनदुबळ्यांचा उद्धार होत असे. त्यामुळे सुरनर त्यांना वंदन करत असत. त्यांच्या देहाची ख्याती स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही लोकात वर्णन करून सांगितली जात असे.

सर्वांनी सात्विक हेवा करावा असा देह लाभला असला तरी त्याबद्दल कसलाही अहंकार न बाळगता त्याचा त्याग करून श्रीपती निजधामाला निघून गेले. जाताना एक मात्र त्यांनी केले ते म्हणजे आपली सगुण मूर्ती आपल्या भक्तांच्या ध्यानात सदैव राहील अशी व्यवस्था केली. त्यामुळे भक्तांच्या नजरेसमोर ते सदैव शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या सगुण रुपात तरळत असतात आणि ते त्यांच्यावर प्रसन्न झाले की, त्या रुपात त्यांना सदेह दर्शन देत असतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.