पांडवांच्यावर कृष्णाची अद्भुत कृपा आहे
अध्याय सहावा
भगवंत म्हणाले, स्वात्मसुखात तल्लीन होऊन, चित्ताचे संयमन करून, निरिच्छ आणि अपरिग्रह झालेला योगी एकांतात आत्मानुभवात तल्लीन असतो. ह्या अर्थाचा साधके चित्त बांधूनि इच्छा संग्रह सोडुनी। आत्म्यास नित्य जोडावे एकांती एकलेपणे ।। 10 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार ब्राम्ही स्थिती प्राप्त झालेला योगी परब्रह्माशी एकरूप झालेला असल्याने सर्व विश्व ब्रह्मव्याप्त असल्याचा अनुभव घेत असतो. भगवंतांनी अर्जुनास ते ब्रह्म तू आहेस असा स्पष्ट बोध केला नाही कारण उपदेश ऐकून अर्जुनाचे आपल्याशी ब्रह्मऐक्य होईल आणि मग मी बोलणार कुणाशी ही चिंता भगवंतांना सतावत होती.
अर्जुन हा श्रीकृष्णाचा सौख्यविसावा होता. त्याच्या दर्शनात, त्याला मिठी मारण्यात श्रीकृष्णाचे सौख्य दडलेले होते. अर्जुन हा भगवंतांच्या सख्य भक्तीचा आश्रय आहे अथवा भगवंतांचा मनाचा तो आरसा आहे. अर्जुन धन्य असून पुण्यपावन आहे. या जगात भक्तिरूपी बी पेरण्यास त्याचे मन हे चांगले शेत होते आणि म्हणूनच तो कृष्णकृपेला पात्र झाला होता अथवा आत्मनिवेदनरूपी भक्तीच्या खालची जी सख्यभक्तीची भूमिका आहे त्यावरील अर्जुन ही मुख्य देवता आहे.
विशेष म्हणजे शेजारीच असलेल्या श्रेष्ठ प्रभूचे वर्णन न करता, भक्ताच्या गुणांचे वर्णन करावे इतकी अर्जुनाची भक्ती श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे तो देवास प्रिय आहे. भक्तीच्या बळावर देवापेक्षाशी श्रेष्ठ भाग्य अर्जुनाच्या वाट्याला आलेले आहे. गंमत पहा, देवाचे भक्तावर फार प्रेम असल्याने तो निराकार, परब्रह्म, परमात्मा सगुणरूप घेतो. देव परिपूर्ण आहेत परंतु त्यांना देखील अर्जुनासारख्या भक्ताचा वेध लागतो. भक्ताच्या निरपेक्ष प्रेमाचे त्यांना एव्हढे ओझे होते की, त्याच्यासाठी काय वाट्टेल ते करायला ते तयार होतात. आता इथेच पहा ना जे जगाचे सारथ्य करणारे महान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करायला सहजी तयार झाले.
माउलींनी केलेले कृष्णाच्या अर्जुनावरील प्रेमाचे रसभरीत वर्णन ऐकून श्रोते चकित झाले त्यांना असे वाटू लागले की, काय आमचे भाग्य? काय बोलण्याचा रंग आहे? याच्या बोलण्याची शोभा नादब्रह्मास जिंकून आली की काय न कळे. अहो मराठी भाषेच्या आकाशात अलंकाररूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत अशी मराठी भाषा याला बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय? ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टपोरे पडले आहे. पहा, त्या व्याख्यानातले निरनिराळे अभिप्राय हाच चांदण्यांचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहजच विकसित होत आहेत.
ज्ञानेश्वर महाराजांचे व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी अशी आहे की निरीच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल. श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी असा प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले व मग श्रोत्यांस म्हणाले, महाराज, लक्ष द्या. पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे कारण कृष्णाने त्यांच्यावर अद्भुत कृपा केली आहे.
क्रमश: