For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'कृष्णा' ला उच्च तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार

01:43 PM Mar 23, 2025 IST | Radhika Patil
 कृष्णा  ला उच्च तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार
Advertisement

कराड :

Advertisement

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. देशातील साखर क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने हा पुरस्कार दिला जाणार आहे. लवकरच नवी दिल्ली येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

देशातील सर्व सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यांतील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे पारितोषिके जाहीर केली जातात.

Advertisement

कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना उत्कृष्टपणे वाटचाल करत आहे. या कार्याची दखल घेत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने उत्कृष्ट कामगिरी आणि उत्कृष्टतेची दखल घेऊन, 2023-24 या हंगामासाठी उच्च साखर उतारा गटात उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठीच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी कृष्णा कारखान्याची निवड केली असल्याचे पत्र नुकतेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी कारखान्यास दिले आहे.

भारत सरकार, सहकार मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कृष्णा कारखान्याची उच्च साखर उतारा या गटात उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम पुरस्कारासाठी निवड झाली आहे. लवकरच हा पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे पार पडणार आहे.

Advertisement
Tags :

.