कृपालु महाराज यांच्या कन्येचा दुर्घटनेत मृत्यू
यमुना एक्सप्रेसवेवर भीषण दुर्घटना
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा
प्रेम मंदिर वृंदावन आणि भक्ति धाम मनगढ कुंडाचे संस्थापक कृपालु महाराज यांच्या परिवाराच्या सदस्यांचा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या ज्येष्ठ कन्या विशाखा त्रिपाठी यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य कन्या श्यामा त्रिपाठी, कृष्णा त्रिपाठी समवेत परिवारातील अन्य सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. महाराजांच्या तिन्ही कन्या सिंगापूर येथे जाण्यासाठी जेवर विमानतळाच्या दिशेने प्रवास करत होत्या. उत्तरप्रदेशच्या नोएडा येथील यमुना एक्सप्रेसवेवर ही दुर्घटना घडली आहे.
एका कँटरने दोन कार्सना मागून धडक दिली होती. या दुर्घटनेत कारमधून प्रवास करणारे 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
या दुर्घटनेत डॉ. विशाखा त्रिपाठी यांचा मृत्यू झाला आहे. तर डॉ. श्यामा त्रिपाटी आणि डॉ. कृष्णा त्रिपाठी यांची प्रकृती गंभीर आहे. जगद्गुरु कृपालु परिषदेने एक शोकसंदेश जारी केला आहे. यात डॉ. विशाखा त्रिपाठी यांच्या पार्थिवावर वृंदावनमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे नमूद आहे. तर स्थानिक पोलिसांनी दुर्घटनेप्रकरणी तपास सुरू केला आहे.