क्रांतिज्योती सावित्रीमाई जयंती अभूतपूर्व होणार
सातारा :
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत नायगाव येथे बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना दिल्या गेल्या. त्यानुसार यावर्षी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती अभूतपूर्व अशी साजरी करण्यात येणार आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांचे आगमन जिह्यात होताच ते आवर्जून खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे र्क्रातिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मारकास भेटीला गेले. तेव्हा तेथे अगोदरच सातारा जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत केले. त्याच वेळी मंत्री गोरे यांनी आढावा घेऊन कार्यक्रम चांगला करा, अशा सूचना केल्या.
याशनी नागराजन यांनी नायगावचे सरपंच, ग्रामस्थ यांच्याकडूनही सूचना वा काही अडचणी असतील त्या जाणून घेतल्या. तसेच या बैठकीमध्ये जयंती कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागराजन यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक खाते प्रमुख यांच्यावर नियोजनाची जबाबदारी सोपवली आहे.