केआर शेट्टी किंग्ज, वनश्री गोकाक उपांत्य फेरीत
तनिष्क चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : अमोदराज स्पोर्ट्स क्लब आयोजित तनिष्क चषक निमंत्रितांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून केआर शेट्टी संघाने नीना स्पोर्ट्स क्लबचा 31 धावानी, तर वनश्री गोकाक संघाने ब्लूस्टार क्रिकेट क्लबचा 104 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. राहुल शिंदे, शुभम बिशनकोप्प यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्लॅटिनम ज्युबिली मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात केआर शेट्टी किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 162 धावा केल्या. प्रशांत लायंदरने 6 चौकारासह 42, गुऊप्रसादने 3 चौकारासह 28 धावा केल्या. नीना स्पोर्ट्सतर्फे ऋतुराज व दीपक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर नीना स्पोर्ट्स संघाचा डाव 16.5 षटकात सर्व गडीबाद 131 धावात गारद झाला.
दीपकने 4 चौकारासह 28, समर्थने तीन चौकारासह 18 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे संतोष सुळगे-पाटीलने 17 धावात 4 तर राहुल शिंदेने 19 धावात 3 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात वनश्री गोकाकने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 190 धावा केल्या. शुभम बिशनकोप्पने 6 षटकार 9 चौकारासह 92, अभिषेकने 6 चौकारासह 35 धावा केल्या. ब्लू स्टारतर्फे नमनने 28 धावात 3 तर एबी आणि दिनेश आणि प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ब्लू स्टार संघाचा डाव 16.3 षटकात सर्व गडी बाद 86 धावात आटोपला. एबीने 20 तर दिनेशने 16 धावा केल्या. वनश्री गोकाकतर्फे शंकर बिडीने 9 धावात 3, शुभम व सुमित यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मंगळवारी धुलीवंदनानिमित्त स्पर्धेला सुट्टी असून बुधवारी उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत.
आज उपांत्य सामने
बुधवारचे उपांत्य फेरीचे सामने वनश्री गोकाक वि. गोकाक स्पोर्ट्स क्लब यांच्यात सकाळी 9.30 वाजता. दुसरा सामना केआर शेट्टी किंग्ज वि. टिळकवाडी क्रिकेट अकादमी यांच्यात दुपारी 1.30 वाजता खेळविण्यात येणार आहे.