Koyna Dam Become Dry कोयना कोरडी झाली अन् इतिहास जागा झाला! धरणाखाली गेलेले रुळे गाव पुन्हा दिसू लागले, पांडवकालीन मंदिरांचे भग्न वैभव उघड्यावर
जितेंद्र कारंडे प्रतापगड| प्रतिनिधी
महाबळेश्वरच्या पवित्र भूमीत उगम पावणारी कोयना नदी ही संपूर्ण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानली जाते. राज्याची तहान भागवणारे आणि महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा करणारे कोयना धरण हे विकासाचे प्रतीक असले तरी या विकासासाठी अनेक गावांनी मोठी किंमत मोजली आहे. त्यातीलच एक म्हणजे महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम रुळे गाव. कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर नदीपात्रात पुन्हा एकदा या गावाच्या जुन्या आठवणी उघड्या पडल्या असून धरणाखाली गेलेल्या गावाचे भग्न अवशेष आजही इतिहासाची साक्ष देताना दिसत आहेत.
कोयना धरणाच्या पाण्याखाली संपूर्णपणे विसावलेल्या जुन्या रुळे गावाचे अवशेष सध्या उघड्यावर आले आहेत. जुन्या घरांचे पाया, दगडी बांधकामांचे अवशेष, समाधी स्थळे, भग्न भिंती, मंदिरांचे खांब, नंदीची भग्न मूर्ती आणि पाण्याखाली लपलेला इतिहास पुन्हा एकदा लोकांसमोर उभा राहिला आहे. अनेक दशकांपासून पाण्याखाली असलेली ही वास्तू आणि अवशेष आज नदीपात्रात स्पष्टपणे दिसत असून गावकऱ्यांसाठी हा भावनिक क्षण ठरत आहे.
गावकऱ्यांच्या आठवणींमध्ये आजही जिवंत असलेले बाजी कुसुंबेश्वर मंदिर, सोमजाई मंदिर, वेताळ मंदिर यांसारखी अनेक प्राचीन मंदिरे नदीपात्रात पाहायला मिळत आहेत. ही मंदिरे पूर्ण स्वरूपात अस्तित्वात नसली तरी त्यांचे भग्नावशेष आणि दगडी खांब पाहताना तत्कालीन स्थापत्यकलेचे वैभव जाणवते. मंदिरातील कोरीव मूर्ती, दगडी शिल्पे, नक्षीकाम केलेले खांब आणि बांधकामाची शैली पाहून त्या काळातील कारागिरांच्या कलेला दाद द्यावीशी वाटते. नदीपात्रात विखुरलेले दगडी अवशेष आणि भग्न नंदी मूर्ती या एकेकाळी समृद्ध असलेल्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाची साक्ष देत आहेत.
गावकऱ्यांच्या मते बाजी कुसुंबेश्वर मंदिर हे पांडवकालीन असून या मंदिराला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी या मंदिर परिसरात १०५ गावांचा न्यायनिवाडा होत असल्याची दंतकथा आजही सांगितली जाते. मंदिराजवळ असलेल्या एका कथित ‘कैची’मध्ये वादग्रस्त व्यक्तींना मान ठेवण्यास सांगितले जाई. खोटे बोलणाऱ्याला मृत्यू ओढवतो आणि सत्य बोलणारा सुखरूप बाहेर पडतो, अशी श्रद्धा त्या काळी होती, असे गावकरी सांगतात. तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून मंदिरात ठेवले जात असे आणि देवाच्या कृपेने त्याचे प्राण वाचतात, अशी लोकश्रद्धाही परिसरात प्रचलित होती. या कथा दंतकथांचा भाग असल्या तरी त्या आजही गावकऱ्यांच्या स्मरणात तितक्याच जिवंत आहेत.
कोयना धरण उभारण्यात आले तेव्हा रुळे गावातील सुमारे दीडशेहून अधिक घरे पाण्याखाली गेल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. गावातील शेती, घरे, देवस्थाने, समाधी स्थळे आणि उपजीविकेची साधने धरणाच्या पाण्यात कायमची बुडाली. त्यानंतर गावकऱ्यांनी वरच्या बाजूस नवीन वस्ती करून पुन्हा संसार उभारला. मात्र गावाचे पुनर्वसन अपेक्षित पद्धतीने झाले नाही आणि अनेकांना योग्य मोबदला देखील मिळाला नसल्याची खंत आजही व्यक्त केली जाते.
गावाचे उपसरपंच भगवान शिंदे सांगतात की, काही ठराविक जमीनधारकांना मोबदला मिळाला असला तरी अनेक कुटुंबे नुकसानभरपाईपासून वंचित राहिली. धरणामुळे गाव उद्ध्वस्त झाले, शेती पाण्याखाली गेली आणि रोजगाराची साधने नष्ट झाली. परिणामी अनेक कुटुंबांना स्थलांतर करावे लागले. धनगर, बौद्ध आणि मराठा समाजाची मोठी वस्ती असलेल्या या गावातील अनेक युवक रोजगारासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांकडे वळले. आजही गावाशी नाळ जुळलेली असली तरी उपजीविकेसाठी बहुसंख्य कुटुंबे बाहेर स्थायिक झाली आहेत.
सध्या नव्या रुळे गावात अवघी २६० च्या आसपास लोकसंख्या वास्तव्यास आहे. त्यामध्येही बहुतांश वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. रोजगार, शिक्षण आणि इतर सुविधांच्या अभावामुळे युवक वर्ग गावाबाहेर आहे. तरीही गावाची एकी, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा आजही कायम आहे. मुंबई, पुणे आणि इतर शहरांत वास्तव्यास असलेले गावकरी वर्षातून ठराविक वेळी गावात एकत्र येतात. गावातील उत्सव, यात्रा आणि धार्मिक परंपरा साजऱ्या करतात. आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न करतात.
कोयना धरणाने गाव, जमीन, मंदिरे, समाधी स्थळे आणि अनेकांच्या आठवणी पाण्याखाली नेल्या; मात्र रुळेकरांची जिद्द संपवू शकली नाही. आज कोयनेचे पाणी ओसरल्याने पुन्हा एकदा जुन्या रुळे गावाचे भग्न वैभव उघड्यावर आले आहे. नदीपात्रात उभे असलेले मंदिरांचे अवशेष, नंदीची भग्न मूर्ती, समाधी स्थळे आणि घरांचे अवशेष केवळ एका गावाचा इतिहास सांगत नाहीत, तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेल्या पिढ्यांच्या संघर्षाची जिवंत साक्ष देत आहेत. कोयना कोरडी झाली आणि रुळे गावाच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. जुन्या गावाचा इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि विस्थापनाच्या वेदना आजही त्या भग्न अवशेषांमधून बोलताना दिसत आहेत