कोयना परिसर पुन्हा हादरला! मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत भूकंपाचे 5 सौम्य धक्के
सातारा : महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसराला मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत भूकंपाचे तब्बल पाच सौम्य धक्के बसले. रात्री साडेबारा ते पहाटे चार वाजेपर्यंतच्या कालावधीत या भूकंपांची नोंद झाली. या धक्क्यांची तीव्रता 2 ते 2.5 रिश्टर स्केल इतकी असल्याने ते नागरिकांना जाणवले नाहीत.
दरम्यान, कोयनानगर येथील भूकंपमापन केंद्र सध्या बंद असल्याने या भूकंपांच्या केंद्रबिंदूचे कोयना धरणापासूनचे अंतर, जमिनीखालील खोली तसेच अक्षांश-रेखांश याबाबतची अचूक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
कोयना धरणाचा परिसर भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. धरणाच्या निर्मितीनंतर या भागात आतापर्यंत लहान-मोठ्या भूकंपांची मोठी मालिका नोंदली गेली आहे. यातील बहुतांश धक्के सौम्य असल्याने नागरिकांना त्यांची जाणीव होत नाही. साधारणपणे तीन रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवू शकतात.
कोयना परिसरात भूकंपाच्या हालचाली सुरू असल्या तरी आतापर्यंत या भूकंपांमुळे कोयना धरणाला कोणताही धोका निर्माण झालेला नसल्याचे उपलब्ध माहितीतून स्पष्ट होते.