Koyana Dam : कोयना, वारणा धरणात जुलैचे पाणी मे महिन्यातच अडविले, महापुराला आमंत्रण
कोयना आणि वारणा धरणातून रविवारपासून विसर्ग बंद करण्यात आलाय
मिरज : मान्सून अद्याप लांबणीवर असताना अवकाळी पावसाच्या रिपरिपीने घाबरगुंडी उडालेल्या प्रशासनाकडून कोयना आणि वारणा धरणातून रविवारपासून विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणात जुलै महिन्यात ५० टक्के पाणीसाठा शिल्लक ठेवण्याची शिफारस केंद्रीय जल आयोगाने केली आहे. मात्र, जुलै महिन्याचा पाणीसाठा मे महिन्यातच अडवून ठेवला जात आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणारा पाऊस आणि सर्वदूर पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे. अलमट्टी धरणातून अद्याप विसर्ग सुरू झालेला नसताना जल आयोगाच्या शिफारशीलाच ठेंगा दाखवून महाराष्ट्रातील धरणात आत्ताच पाणी अडवून ठेवणे धोक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्र शासनाने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून अलमट्टीचा विसर्ग सुरू केल्याशिवाय महाराष्ट्रातील धरणांचा विसर्ग बंद करु नये. अन्यथा यंदा महापुराचा धोका अटळ असल्याची भिती केंद्रीय जलआयोगातील महापुराचा अभ्यास करणाऱ्या जलतज्ञांनी व्यक्त केली आहे.
देशातल्या सगळ्याच धरणांचा अभ्यास करून केंद्रीय जलआयोग मोठ्या धरणासाठी पावसाळ्याच्या काळातील धरण परिचलन आराखडा तयार करून घेत असते. धरण पाणलोट क्षेत्र, मुक्त पाणलोट क्षेत्र आणि धरणाच्या लाभ क्षेत्रात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून केंद्रीय कोयना व वारणा धरणात जुलैचे पाणी मे जल आयोगाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या परिचलन आराखड्याला मान्यता देत असतानाही केंद्रीय जल आयोगाने धरण परिचलनाचा आराखडा दिला आहे. असे असताना कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनाकडून जलआयोगाच्या शिफारशींकडे प्रत्येकवेळी कानाडोळाच केला गेला आहे. यंदाचा मान्सून नुकताच केरळात दाखल झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून सर्वदूर अवकाळी पाऊस कोसळत आहे.
मोसमी पाऊस कधी सुरू होणार, याची शाश्वती नाही. अवकाळी पावसाच्या अंदाजावरच हवामान विभागाने वेगवेगळ्या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. यंदा पाऊस लवकर दाखल झाला असला तरी अवकाळीला घाबरण्याचे कारण नाही. मात्र, महाराष्ट्रातील कोयना व वारणासह अन्य धरण व्यवस्थापनांनी अवकाळीचे पाणी अडवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
वास्तविक मे महिन्यात धरणामध्ये केवळ दहा टक्के साठा शिल्लक ठेवण्याची शिफारस जल आयोगाने केली आहे.५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जुलै महिन्यात अडविणे गरजेचे असतानाच मे महिन्यातच निम्मे धरण भरल्यास ऐन पावसाळ्याच्या दिवसातील पाणी कोठे जाणार? याचा अभ्यास धरण व्यवस्थापनांनी केला पाहिजे.
जून आणि जुलै महिन्यात अशीच पावसाची रिपरिप सुरू राहिली आणि आलमट्टीचा विसर्गही बंदच राहिला तर महाराष्ट्रातील धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तेव्हा मात्र महापुराचे संकट दाराशी येऊन थांबेल, अशी भिती जल अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला २००५ आणि २०१९ साली महाप्रलयंकारी महापूराचा तडाखा बसला. तेव्हाही जलआयोगाच्या शिफारशीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच धरणातील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन फिस्कटले होते. परिणामी दोन्ही जिल्हे महापुरात उद्ध्वस्त झाली.
जल आयोगाने अलमट्टी धरण व्यवस्थापनाला दिलेल्या परवानगीनुसार पाण्याची अडवणूक गरणे गरजेचे आहे. पण कर्नाटकला पाण्याचा नेहमी अतिहव्यास असतो. त्यामुळे त्यांच्याकडून या मार्गदर्शक सूचना पाळल्या जात नाहीत आणि त्याचा फटका कोल्हापूर व सांगलीला बसतो.
२००५ पासून आजतागायत ज्यावेळी अलमट्टीत अनिर्बंध साठा केला गेला त्याचवेळी सांगली, कोल्हापूरात पूर आला, हा इतिहास आहे. महाराष्ट्रातील पाटबंधारे अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सुचनांची माहिती आहे. आणि अलमट्टी धरण प्राधिकरण या सूचनांचे पालन करत नाही, अशी अवस्था आहे.
मार्गदर्शक सूचना पाळून पूरनियंत्रण शक्य असताना शासन-प्रशासनाकडून नेहमी जल आयोगाच्या शिफारशीला ठेंगा दाखविल्यामुळे महापूराचा धोका उद्भवत आला आहे. यंदा महापूर टाळायचा असेल तर शिफारशीनुसारच धरणातील साठा आणि विसर्ग करणे गरजेचे आहे.
अभ्यासाअंति तयार केलेल्या शिफारस सांगते...
- १ जूनपर्यंत धरणात १० टक्के साठा ठेवावा
- जुलैअखेर ५० टक्के पेक्षा जास्त साठा करु नये
- ऑगस्ट अखेर ७० टक्के पेक्षा जास्त साठा करू नये
अलमट्टी धरणात...
- जून अखेर ५१३ मीटर पाणी पातळी असावी
- जुलै पहिला पंधरवड्यात ५१७:११ मीटर
- जुलै दुसरा पंधरवड्यात ५१३:६६ मीटर
- ऑगस्ट पहिला पंधरवड्यात ५१८:६६ मीटर
- ऑगस्ट दुसऱ्या पंधरवड्यात ५१९:६० मीटर