सभापती ॲड. आकांक्षा चौगुलेंच्या मध्यस्थीने कोरेगाववाडीचे आमरण उपोषण स्थगित
उमरगा : ग्रामपंचायत निधीच्या विनियोगाचा हिशोब द्यावा, कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि गावातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, या मागण्यांसाठी कोरेगाववाडी ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले.
ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत पंचायत समितीच्या सभापती ॲड. आकांक्षा चौगुले यांनी मध्यस्थी केली. ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आल्याचे पत्र त्यांच्या हस्ते ग्रामस्थांना देण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
चौकशी समितीने गावातील ग्रामपंचायतीच्या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, तसेच प्रत्येक कामाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, अशा स्पष्ट सूचना सभापती ॲड. चौगुले यांनी दिल्या. चौकशी प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि प्रत्यक्ष कामाची स्थिती स्पष्ट व्हावी, यासाठी या सूचना देण्यात आल्या.
चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही ॲड. चौगुले यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत निधीचा हिशोब, विकासकामांमधील कथित अनियमितता आणि प्रलंबित कामांबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता चौकशी समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार का आणि कोरेगाववाडीतील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.