Satara News : पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की
12:28 PM Jun 08, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
एकंबे : कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसमोरच आक्रमक वर्तन करत शासकीय कार्यालयात धिंगाणा घालणाऱ्या एका युवकाविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयातच अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कागदपत्रांची नासधूस करणे आणि कार्यालयातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देणे या प्रकारामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निखील दिनकर नाळे (रा. राजापूर, ता. खटाव) याच्याविरुद्ध शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार दि. ६ जून रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी कार्यालयातील वाचक पोलीस उपनिरीक्षक सुधीर विष्णू बनकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने निखील नाळे याला सुनावणीसाठी कार्यालयात बोलावण्यात आले होते. यासाठी त्याला नियमानुसार रजिस्टर पोस्टद्वारे नोटीसही पाठविण्यात आली होती. मात्र, सुनावणीदरम्यान नाळे याने संयम गमावत कार्यालयातच मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला.
शिवीगाळ आणि धमकावण्याचा प्रकार करत त्याने थेट उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या दिशेने धाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढे सरसावलेल्या बाचक उपनिरीक्षक सुधीर बनकर यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना जोरात ढकलल्याने ते खाली पडले. या घटनेत त्यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत देखील झाली आहे.
याचवेळी नाळे याने कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. त्यामुळे काही काळ कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. एवढ्यावरच न थांबता त्याने शासकीय दस्तऐवज फाडून त्यांचे नुकसान केले तसेच टेबलवरील कागदपत्रे आणि साहित्य खाली फेकून कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण केले. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अमित गायकवाड करीत आहेत.
Advertisement
Advertisement